

पुणे: पुण्यात काही हॉटेल्स 70 वर्षे जुनी आहेत, तर काही हॉटेल्सनी स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण केलेली आहेत. सुरुवातीला चुलीवर जेवण आणि काळ बदलल्यानंतर आलेला व्यावसायिक गॅस... असे टप्पे या जुन्या हॉटेल व्यावसायिकांनी पाहिले आहेत. पण, इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच गॅसपुरवठा ठप्प झाल्याचा अनुभव व्यावसायिकांना आला आहे.
त्यात आता फक्त एक दिवस पुरेल इतकाच पुरवठा त्यांच्याकडे उपलब्ध असल्याने शुक्रवारपासून (दि. 13) नाइलाजाने व्यवसाय बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. इतकेच नव्हे, तर शहरातील या जुन्या हॉटेल्समध्ये काही पुणेकर खवय्ये रोज, तर काही खवय्ये आठवड्यातून दोनदा जेवणासाठी येतात. हॉटेल बंद झाल्याचा फटका त्यांनाही सहन करावा लागणार आहे.
पुण्यातील अनेक जुन्या खानावळी, हॉटेल्सने ही परंपरा पुढे नेली आहे. कुठे थाळी पद्धत सुरू आहे, तर कुठे लज्जतदार पदार्थांमुळे त्या हॉटेल्सची ओळख निर्माण झाली आहे. पण, युद्धामुळे आता व्यावसायिक गॅसपुरवठा बंद झाल्याचा परिणाम या जुन्या हॉटेल व्यवसायावरही झाला आहे.
शभंर वर्षे पूर्ण केलेल्या पूना बोर्डिंग हाऊसचे संचालक सुहास उडपीकर म्हणाले, ‘व्यवसायाच्या इतक्या वर्षांत पहिल्यांदाच व्यावसायिक गॅसपुरवठा ठप्प झाल्याचा अनुभव आला आहे. कारण, आधी अशी परिस्थिती कधीच उद्भवली नाही. आता आमच्याकडे एक दिवस पुरेल इतका गॅसपुरवठा आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शनिवारपासून भोजनालय बंद करावे लागणार आहे.
आता काय करावे?
मी एकटाच राहतो. वयोमानामुळे मला स्वत: जेवण बनविणे शक्य होत नाही. त्यामुळे मी जेवणासाठी गेल्या वीस वर्षांपासून भोजनालयामध्ये जात आहे. गॅसपुरवठ्यामुळे हॉटेलच बंद झाले तर ज्येष्ठ नागरिकांनी कुठे जेवायला जावे? हा प्रश्न आहेच. गॅसपुरवठा सुरळीत करण्यावर तातडीने पावले उचलली जावीत, असे ज्येष्ठ नागरिक शिशिर प्रधान यांनी सांगितले.