पुणे: वाहन चालकांना आता पक्का परवाना मिळवण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही. परिवहन आयुक्तालयाने हडपसर, आळंदी आणि सासवड येथे तीन नवीन ‘स्वयंचलित वाहनचालन चाचणी पथ (अॅटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्टींग ट्रॅक -एडीटीटी)’ उभारण्यास मंजुरी दिली आहे. याचे काम येत्या महिन्याभरात सुरू होणार आहे.
त्यामुळे पुण्यातील आयडीटीआर (पीसीएमसी, भोसरी, नाशिक फाट्याजवळ) येथील सध्याच्या सुविधेसोबतच आता एकूण चार ठिकाणी अत्याधुनिक ड्रायव्हिंग चाचण्या (पक्का परवाना चाचणी) घेणे शक्य होणार आहे. यामुळे परवाना चाचणीसाठी लागणारा प्रतीक्षा वेळ (वेटिंग टाईम) कमी होईल आणि नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळच वाहन चालवण्याचा पक्का परवाना चाचणी देण्याची सोय उपलब्ध होणार आहे. (Latest Pune News)
कशी असेल नवीन चाचणी?
स्वयंचलित वाहन चालन चाचणी पथ (एडीटीटी) : हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान-आधारित चाचणी प्रणाली आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेपाशिवाय उमेदवाराच्या वाहन चालन कौशल्याचे मूल्यमापन केले जाणार आहे.
सेन्सर अन् कॅमेरा आधारित तपासणी : या ट्रॅकवर विविध सेन्सर्स आणि कॅमेरे लावलेले असतात. ते उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवतात. यामध्ये ‘ड’/‘एच’ ट्रॅक, ‘8’ ट्रॅक, समांतर पार्किंग आणि चढावर वाहन थांबवून पुन्हा पुढे नेणे यांसारख्या कौशल्यांची चाचणी घेतली जाते.
त्रुटीरहित मूल्यांकन : मानवी चुका टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरते. लहानशा चुकीसाठीही गुण कमी होतात, त्यामुळे वाहनचालकांची चाचणी अधिक कडक होणार आहे.
अद्ययावत अहवाल : चाचणी पूर्ण झाल्यावर त्वरित आणि अचूक अहवाल तयार होतो, हा अहवाल (रिपोर्ट) उमेदवाराला त्याच्या कामगिरीबद्दल माहिती देतो.
एकावेळी अनेक चाचण्या : ही प्रणाली एकाच वेळी अनेक उमेदवारांची चाचणी घेण्यासाठी डिझाइन केलेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने अर्जदारांना जलद सेवा देणे शक्य होईल.
ठेकेदाराची नियुक्ती; महिनाभरात कामाला सुरुवात
या प्रकल्पासाठी मे. अशोक बिल्डकॉन लि. यांची ठेकेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर सीआयआरटी (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट) प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार आहे. पुढील महिनाभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती पुण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दै.‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
फायदे काय?
वेळेची बचत : नागरिकांना लांबचा प्रवास टाळता येईल, त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होईल.
सोयीस्कर : हडपसर, आळंदी आणि सासवड येथील स्थानिक रहिवाशांना त्यांच्या जवळच चाचणी सुविधा मिळेल.
प्रतीक्षा वेळ कमी : नवीन केंद्रे सुरू झाल्याने पक्का परवान्यासाठीची प्रतीक्षा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
पुण्यात यापूर्वी केवळ एकाच ठिकाणी एडीटीटी सुविधा होती. त्यामुळे नागरिकांना लांब प्रवास करून यावे लागत असे. आता हडपसर (हांडेवाडी), आळंदी रोड आरटीओ कार्यालय आणि दिवे घाट (सासवड) येथे नवीन एडीटीटी केंद्रे सुरू होणार असल्यामुळे नागरिकांना खूप सोयीचे होणार आहे. यामुळे पक्का परवाना चाचणीचा केवळ प्रतीक्षा वेळच कमी होणार नाही, तर वाहन चालवण्याचे कौशल्य अधिक काटेकोरपणे तपासले जाईल, त्यामुळे रस्त्यांवरील सुरक्षितता वाढेल.
- अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे