

11th Admission First round admission last date
पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलैदरम्यान प्रवेशाची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार आज सोमवारी (दि.7) विद्यार्थ्यांना प्रवेशाची शेवटची संधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोटा तसेच कॅपचे प्रवेश मिळून आतापर्यंत चार लाख 57 हजार 132 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहेत.
अकरावी प्रवेशासाठी पहिल्या प्रवेशफेरी अंतर्गत राज्यात सहा लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर केला आहे. यामध्ये पुणे विभागांतर्गत एक लाख 16 हजार 291 जागांसाठी प्रवेश जाहीर केला होता. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना आज 7 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. (Latest Pune News)
पहिल्या प्रवेश फेरीसाठी राज्यातील 10 लाख 66 हजार पाच विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यात कला शाखेच्या दोन लाख 31 हजार 356 विद्यार्थ्यांनी तर वाणिज्य शाखेच्या दोन लाख 24 हजार 931 विद्यार्थ्यांनी आणि विज्ञान शाखेच्या सहा लाख नऊ हजार 718 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्या 10 लाख 66 हजार पाच विद्यार्थ्यांपैकी सहा लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंती क्रमांकानुसार पहिल्या फेरीसाठी प्रवेश जाहीर केला आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात नऊ हजार 435 महाविद्यालयांमध्ये 16 लाख 70 हजार 598 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच चार लाख 53 हजार 122 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 23 हजार 720 जागा उपलब्ध आहेत.
त्यासाठी 13 लाख 66 हजार 632 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी तीन लाख 82 हजार 246 विद्यार्थ्यांनी कॅपद्वारे तसेच 74 हजार 886 विद्यार्थ्यांनी विविध कोटाअंतर्गत अशा एकूण चार लाख 57 हजार 132 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे.
आता प्रवेशासाठी कॅप प्रवेशाच्या 12 लाख 88 हजार 352 आणि कोटा प्रवेशाच्या तीन लाख 78 हजार 236 अशा एकूण 16 लाख 66 हजार 588 जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या फेरीसाठी मुदतवाढ द्यायची किंवा अकरावी प्रवेशाच्या दुसर्या फेरीसाठी पुढील प्रक्रिया चालू करायची, याबाबत सोमवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.