

पुणे: बाणेर, बालेवाडी आणि वाकडला जोडणारा मुळा नदीवरील पुलासाठी जागामालक जागा देत नसल्याने पुणे महापालिका प्रशासनाने आता सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच या जागा ताब्यात येऊन हा पुलासाठी जोड रस्ता विकसित होऊन तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी 2013 मध्ये बालेवाडी आणि वाकड यांना जोडणारा मुळा नदीवरील पुलाला संयुक्तरीत्या मंजुरी दिली. मात्र, पुलाचे काम 2018-19 ला पूर्ण विलंबाने पूर्ण झाले. त्यासाठी तब्बल 31 कोटींचा खर्च करण्यात आला. (Latest Pune News)
मात्र, अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी सुरू झालेला नाही. पूल सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांचे भूसंपादन न झाल्याने हा पूल सुरू करता येत नाही. प्रामुख्याने महापालिका हद्दीतील बालेवाडीतील जागामालकांकडून जागा दिली जात नसल्याने जोड रस्त्याअभावी पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भूसंपादनासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका अधिकार्यांसमवेत शुक्रवारी बैठक घेऊन आढावा घेतला.
त्यात पुलाच्या जोड रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या 15 हजार चौरस मीटर जागेचे 11 जागा मालक आहेत. ते जागा देत नसल्याने महापालिकेने सक्तीने भूसंपादनाची प्रकिया सुरू केली आहे. महापालिकेकडून या जागेच्या मोजणीचे शुल्क भरले असून जागांची अॅवार्ड करण्याची प्रकिया केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकियेसाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवून लवकरात लवकर भूसंपादन करा असे आदेश मंत्री पाटील यांनी महापालिका आयुक्तांना बैठकीत दिले.