

पुणे: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्नित तसेच स्वायत्त संस्थांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये संस्थांची बाह्य मूल्यांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला परिषद आणि शासनमान्य कौशल्याधारित पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांच्या प्रत्यक्ष तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. हे मूल्यांकन १६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान बाह्य संस्था अवेक्षण समितीमार्फत केले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. मारुती जाधव यांनी यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. मंडळाशी संलग्नित सर्व संस्था तसेच स्वायत्त संस्थांनी संस्थांच्या अवेक्षणासंदर्भातील आवश्यक माहिती ऑनलाइन पद्धतीने भरण्याबाबत यापूर्वीच परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले होते.
आता या प्रक्रियेचा पुढील टप्पा म्हणून बाह्य समित्यांमार्फत प्रत्यक्ष संस्थाभेटी घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे. मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. संस्थांनी या प्रक्रियेत समितीला सहकार्य करणे आवश्यक असून, मूल्यांकनाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांच्या प्राचार्यांवर राहणार आहे.
मुदतीत मूल्यांकन न झाल्यास कारवाई
निर्धारित कालावधीत ज्या संस्थांचे बाह्य समितीमार्फत मूल्यांकन होणार नाही, अशा संस्थांमधील अभ्यासक्रमांबाबत अनियमिततेची कारवाई करण्याचा इशाराही मंडळाने दिला आहे. त्यामुळे संबंधित संस्थांनी मूल्यांकनासाठी आवश्यक तयारी पूर्ण करून समितीला सहकार्य करणे गरजेचे आहे.
या मूल्यांकन प्रक्रियेमुळे तंत्रशिक्षण संस्थांमधील गुणवत्ता, प्रशिक्षण सुविधा आणि शैक्षणिक निकषांच्या पालनावर भर दिला जाणार असून, संस्थांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.