Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीची रंगत वाढली!

पहिल्याच दिवशी पदवीधरसाठी ३६, शिक्षक मतदारसंघासाठी १९ इच्छुकांनी घेतले अर्ज; प्रमुख पक्षांचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात
Graduate Teacher Constituency Election
Graduate Teacher Constituency ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे पदवीधर व शिक्षक विभागाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी पदवीधरसाठी ३६ उमेदवारांनी, तर शिक्षकसाठी १९ उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. परंतु अद्याप एकाही प्रमुख पक्षाकडून उमेदवारच जाहीर करण्यात आले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्यास सुरुवात होऊनही उमेदवार गुलदस्त्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर येत्या दोन ते तीन दिवसांत विविध पक्षांचे उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Graduate Teacher Constituency Election
Pune Family Planning: पुण्यात कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच; ८४२२ महिलांमागे केवळ ३८९ पुरुषांची नसबंदी

दोन्ही जागांसाठी आता चुरस वाढणार

पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दोन्ही जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. आता राज्यात महायुतीचे सरकार असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झालेत आहेत, तर भारतीय जनता पार्टीने यंदा स्वबळावर दोन्ही जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे भाजपच्या उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी आता चुरस वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे पदवीधर व शिक्षक हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. परंतु राजकीय गणिते बदलल्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनीही या मतदारसंघातून आपले उमेदवार उभे करण्याबाबत आग्रह धरला आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा एकदा आपल्याला महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे, तर ‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’’ अशी भूमिका घेऊन मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व प्राध्यापक सचिन सानप निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पुण्यातून शिक्षक संघटनेचे पदाधिकारी नंदकुमार सागर हेसुद्धा इच्छुक आहेत, तर पुण्यातील शिक्षकेतर संघटनेचे नेते शिवाजी खांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांकडून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपच्या पुण्यातील मंत्र्यांकडून शरद लाड यांना पदवीधरची उमेदवारी मिळावी, असा आग्रह असल्याचे बोलले जात आहे. तर, कोल्हापूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी आपले नातेवाईक भैय्या माने यांना उमेदवारी मिळावी, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

Graduate Teacher Constituency Election
Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुरुषोत्तम जगतापांचा स्वतंत्र पॅनेलचा निर्णय; संजय जगतापांची साथ

त्यातच माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख-जाधव यासुद्धा पदवीधर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ऋषिकेश महेंद्र लाड हे आमदार विश्वजित कदम यांचे नातेवाईक असून, त्यांना कॉंग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यांसह अन्य इच्छुक उमेदवारांपैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, हे येत्या दोन ते तीन दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

उमेदवारांना निवडणूक चांगलीच जड जाणार...

येत्या दि. ९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु नव्या मंतदारांपर्यंत तेही पाच जिल्ह्यांत १० ते १२ दिवसांत पोहोचणे हे निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी आव्हान असणार आहे. त्यामुळे शिक्षक व पदवीधर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना ही निवडणूक चांगलीच जड जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्याच दिवसाची अर्जस्थिती

  • पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ

  • एकूण नेलेले अर्ज- ६१

  • अर्ज नेलेल्या व्यक्तींची संख्या- ३६

Graduate Teacher Constituency Election
Pune Swine Flu: पुण्यात स्वाईन फ्लूचा उद्रेक; ९ महिन्यांत ६९१ रुग्ण, ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच ६२६ बाधित

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ

  • एकूण नेलेले अर्ज- ३६

  • अर्ज नेलेल्या व्यक्तींची संख्या-१९

नामनिर्देशनपत्रांची छाननी ऑक्टोबरला

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ आणि पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून प्रत्येकी एका सदस्याची निवड करण्यासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी मंगळवारी निवडणुकीची अधिकृत सूचना प्रसिद्ध केली.

निवडणुकीसाठी उमेदवार किंवा त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला नामनिर्देशनपत्र मंगळवारी ६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दाखल करता येणार आहे. सार्वजनिक सुट्टी वगळता सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सह आयुक्त (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रेही याच ठिकाणी व वेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Graduate Teacher Constituency Election
Baramati Crime: बारामतीत गंभीर गुन्ह्यांच्या घटनांनी चिंता वाढली; अल्पवयीनांच्या हाती घातक शस्त्रे

नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची इच्छा असलेल्या उमेदवाराला किंवा त्याने लेखी प्राधिकृत केलेल्या प्रस्तावकाला अथवा निवडणूक प्रतिनिधीला शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे सूचना देता येईल. निवडणूक लढवली गेल्यास शुक्रवारी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.

निवडणुकीची सूचना निवडणूक निर्णय अधिकारी, विभागातील सर्व जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महापालिका आयुक्त, नगरपालिका, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवरही ही सूचना प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news