

बारामती: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप व पुरंदर तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काॅंग्रेसला सोबत घेत सवता सुभ्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा त्यांनी वाणेवाडीतील मेळाव्यात केली.
मेळाव्यात पुरुषोत्तम जगताप म्हणाले, या पॅनेलच्या माध्यमातून स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व त्यांच्या कुटुंबियांविषयी आम्हाला नितांत आदर आहे. पवार यांच्यावर आघात झाल्यावर अचानक जबाबदारी स्विकारावी लागली. अनुभव नसताना त्या खंबीरपणे सामोरे जात आहेत. परंतु या निवडणूकीत ज्या त्या वेळेला ज्या गोष्टी होणे अपेक्षित होते त्या झाल्या नाहीत. त्यामुळे संजय जगताप, सुदाम इंगळे, माणिकराव झेंडे यांच्याशी चर्चा करून कशा पद्धतीने पुढे जायचे हे ठरवले आहे.
सहकारी संस्थेत राजकारण नको ही आमची भूमिका आहे. सभासदांच्या प्रपंचाशी निगडीत ही संस्था आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वप्न होते की सोमेश्वर देशात क्रमांक एकवर जावा. सभासदांचा आर्थिक स्तर उंचवला जावा, प्रगती व्हावी. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे.
कारखान्यासाठी आमच्या कुटुंबियांनीही मोठे योगदान दिले. त्यावेळी २३० एकर जागा दानशूर मंडळींनी मोफत दिली. त्यातून हा कारखाना उभा राहिला. मी भविष्यात चेअरमन, संचालक असेल नसेल परंतु कारखान्याचा सभासद निश्चित असेल. आमच्या वाडवडीलांनाी द्यायचे शिकवले, घ्यायचे नाही. परंतु काहींनी कारखान्याची संस्था बळकावली. सध्या तो विषय उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे त्या मंडळींना कारखाना निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही. त्यांनी आधी सभासदांची संस्था माघारी द्यावी व नंतर निवडणूक लढवावी एवढीच आमची भूमिका होती.
परंतु त्या होत नसल्याने नाईलाजाने निवडणूकीला सामोरे जावे लागत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. काही गोष्टी घडू शकतात. परंतु त्या जर घडल्या नाहीत तर ज्या गोष्टीला सामोरे जावे लागेल ती तयारी ठेवली असल्याचे ते म्हणाले. मेळाव्यात माजी आमदार संजय जगताप, झेंडे, इंगळे यांचीही भाषणे झाली.
सभास्थानी लावलेला बॅनर हटवला
जगताप यांनी मेळावा स्थळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे छायाचित्र बॅनरवर लावले होते. राष्ट्रवादीने अजितदादांचा फोटो कुटुंबियांच्या परवानगीशिवाय वापरू नये असे पत्रक काढल्यानंतर सभास्थानचा हा बॅनर हटविण्यात आला.