

पुणे: विद्येचे माहेरघर व आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचा कायापालट करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. आरोग्य, शिक्षण, वाहतूक आणि तंत्रज्ञान, अशा सर्वच आघाड्यांवर पुणेकरांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविण्यासाठी एक व्यापक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
1 रुपयात अद्ययावत उपचार, महिलांना मालमत्ता करात 50 टक्के सवलत, स्टार्टअपसाठी मोफत इन्क्युबेशन सेंटर आणि देशातील पहिले महापालिका डेटा सेंटर, अशा अनेक प्रकल्पांमुळे पुण्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. महापालिकेच्या या ‘सुपर व्हिजन’मुळे पुणे ‘ग्लोबल सिटी’च्या दिशेने झेपावणार आहे, असा विश्वास व्यक्त करीत महत्त्वाचे प्रकल्प सहा महिन्यांत पूर्ण करणार, असा संकल्प महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला.
दै. ‘पुढारी’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान श्रीनाथ भिमाले यांनी संपादकीय विभागाशी संवाद साधला. या वेळी त्यांनी आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांबाबतच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. आरोग्य विभागाबाबत बोलताना भिमाले यांनी सांगितले की, शहरातील सहा प्रसूती रुग्णालये (मॅटर्निटी हॉस्पिटल्स) कॉर्पोरेट दर्जाची केली जात आहेत. दळवी, कमला नेहरू यांसारख्या रुग्णालयांत आयसीयू, अद्ययावत ऑपरेशन थिएटर आणि विशेष ‘डॅशिंग डॅशबोर्ड’ प्रणाली असेल, ज्यामुळे रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांवर थेट लक्ष ठेवता येईल.
विशेष म्हणजे, या सुविधा केवळ 1 रुपयात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, बाणेर येथे पीपीपी तत्त्वावर देशातील अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येत असून, तिथे महागड्या चाचण्या आणि उपचार केवळ 20 टक्के दरात मिळतील. भिमाले म्हणाले, महापालिका स्वतःचे ‘डेटा सेंटर’ उभारणारी देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. यामुळे महापालिकेचा सर्व गोपनीय डेटा सुरक्षित राहील. तंत्रकुशल तरुणांसाठी भिमाले यांनी अमेरिकन कंपन्यांच्या सहकार्याने 1000 विद्यार्थी क्षमतेचे मोफत ‘स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर’ जाहीर केले आहे. तिथे प्रशिक्षण घेणाऱ्या इंजिनिअर्सना थेट नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
शहर वाहतूक कोंडीमुक्त करणार
वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पीएमपीच्या ताफ्यात 2500 नवीन बस दाखल होत आहेत. पर्वती ते पेशवे पार्कदरम्यानचा ‘रोप-वे’, येरवडा ते कात्रज असा 14.5 किमीचा भुयारी मार्ग आणि मल्टिस्टोरी पार्किंगच्या माध्यमातून शहर कोंडीमुक्त करण्याचा प्रयत्न आहे, असे भिमाले यांनी सांगितले.
‘सावित्री’तून 25 टीएमसी पाणी आणण्याच्या योजनेचा पाठपुरावा करणार
पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी केवळ मुळशी धरणाचे पाणी पुरेसे ठरणार नाही. त्यामुळे मुळशी धारणातूनच नाही, तर महाडच्या सावित्री नदीतून 25 टीएमसी पाणी उचलण्याच्या कधीकाळी मांडण्यात आलेल्या योजनेचा अभ्यास करून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले. यासोबतच शहरात वाघोली, मांजरी भागांत ड्रेनेजचे जाळे आणि 11 नवीन एसटीपी प्लांटचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातील 9 एसटीपी लवकरच सुरू केले जाणार आहे. तर शहरातील ‘रिव्हर फ्रंट’ प्रकल्प पुढच्या सहा महिन्यांत पूर्ण करून पुणेकरांना पर्यटनासाठी एक मोठी भेट दिली जाणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले.