

राजगुरुनगर: राजगुरुनगर शहरातील प्रसिद्ध पांडवकालीन सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी (दि २०) चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दोन दानपेट्या फोडून भाविकांच्या दान केलेल्या रकमेवर डल्ला मारला.
विशेष बाब म्हणजे हे मंदिर खेड पोलिस ठाण्या समोर हाकेच्या अंतरावर आहे. राजगुरुनगर येथील भोपाळबुवा आणि सिद्धेश्वर महाराजांची यात्रा शुक्रवार पासून रविवार पर्यंत सुरळीत आणि उत्साहात पार पडली. यात्रा संपताच ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
भीमा नदीच्या काठावर अत्यंत रमणीय परिसरात सिद्धेश्वर मंदिर आहे. मंदिर हे परिसरातील भाविकांचे पश्रद्धास्थान आहे. मंदिरातील पुजारी सकाळी पुजेसाठी आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला.घटनेची माहिती पुजाऱ्यांनी दिल्या बरोबर राजगुरुनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.
घटनास्थळी श्वान पथक (डॉग स्क्वाड) पाचारण करण्यात आले असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, ठसे आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा वापर करून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी सांगितले की, चोरीची रक्कम किती होती याचा अंदाज लवकरच कळेल.
भाविकांच्या श्रद्धेवर घाला घालणाऱ्या या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू असून, लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल, असे निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले. या घटनेमुळे मंदिर परिसरात खळबळ उडाली असून, भाविकांनी पोलिसांकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे.