PMC Garden Department Vacancies: ‘हरित पुणे’च्या दाव्यांना धक्का; महापालिका उद्यान विभागातील ९० टक्के पदे रिक्त

वृक्षसंवर्धन, अवैध वृक्षतोड रोखण्यावर परिणामाचा आरोप; तातडीने भरतीची मागणी
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: 'हरित पुणे'ची घोषणा करीत शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढविण्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे महापालिकेच्या उद्यान विभागातच तब्बल ९० टक्के पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरात वाढते काँक्रिटीकरण, अवैध वृक्षतोडीच्या तक्रारी आणि पावसाळ्यात झाडे पडण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे. माहिती अधिकारातून ही माहिती मिळाल्याचा दावा करीत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र पाठवून तातडीने पदभरती करण्याची मागणी केली आहे.

Pune Municipal Corporation
PMC Road Mitra App Closed: पुणेकरांच्या खड्डे तक्रारींसाठीचे ‘पीएमसी रोड मित्र’ ॲप चार महिन्यांपासून बंद

वेलणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यान विभागात उद्यान निरीक्षकांची आठ मंजूर पदे आहेत. मात्र, त्यापैकी केवळ एकच पद भरलेले असून, सात पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे मिस्त्रींच्या ३३ मंजूर पदांपैकी फक्त चार कर्मचारी कार्यरत असून, तब्बल २९ पदे अद्याप रिक्त आहेत. म्हणजेच, या दोन्ही संवर्गातील एकूण ४१ पदांपैकी केवळ पाच पदांवर कर्मचारी कार्यरत असून, जवळपास ९० टक्के पदे रिक्त असल्याचे चित्र आहे. उद्यान निरीक्षकांवर शहरातील उद्याने, रस्त्यालगतचे हरित पट्टे आणि वृक्षांची नियमित पाहणी करण्याबरोबरच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, शास्त्रोक्त छाटणी, पाणीपुरवठा, कर्मचाऱ्यांचे नियोजन, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच वृक्षतोड आणि पुनर्लागवडीच्या कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असते. तर, मिस्त्री हे प्रत्यक्ष कामांचे पर्यवेक्षण करून माळी आणि कामगारांकडून ही कामे करवून घेतात.

Pune Municipal Corporation
Maharashtra 60000 km Road Development: महाराष्ट्रातील ६० हजार किमी रस्ते होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे; १७ हजार ४०० कोटींचा निधी

मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने ही सर्व कामे प्रभावीपणे कशी पार पडत असतील, असा सवाल वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. अवैध वृक्षतोड रोखणे, धोकादायक झाडांची शास्त्रोक्त छाटणी करणे, याची पडताळणी करणे तसेच शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी देशी वृक्षांची लागवड करणे, या महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, अनेक ठिकाणी मिस्त्रींची पदे रिक्त असल्याने माळ्यांकडूनच पर्यवेक्षणाची कामे करून घेत वेळ मारून नेली जात असल्याचाही दावा त्यांनी पत्रात केला आहे.

Pune Municipal Corporation
Maharashtra Rainfall Deficit Update: राज्यात पावसाची विषमता कायम; १६ जिल्ह्यांत तूट, नंदुरबारमध्ये ७४ टक्के कमतरता

या पार्श्वभूमीवर उद्यान निरीक्षक आणि मिस्त्रींची सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करून उद्यान विभाग सक्षम करावा, अशी मागणी वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या पत्रामुळे महापालिकेच्या 'हरित पुणे' धोरणाच्या अंमलबजावणीवर आणि शहरातील हरित व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Pune Municipal Corporation
Rajgad 11 Teachers Notice: अतिवृष्टीत गावात थांबण्याचे आदेश धुडकावले; राजगडमधील ११ शिक्षकांना नोटिसा

उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांची काही पदे रिक्त आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ९० टक्के पदे रिक्त आहेत, असे काही नाही. पदोन्नती देऊन जागा भरण्यात आलेल्या आहेत. जी पदे रिक्त आहेत. त्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आली असून, त्यांच्या मान्यतेनंतर लवकरच ही रिक्त पदे भरली जातील.

अशोक घोरपडे, उद्यान विभागप्रमुख, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news