

पुणे: गणेशोत्सवातील ध्वनियंत्रणेचा अतिरेक शंभर टक्के कमी झाला पाहिजे, याबाबत दुमत नाही. मात्र, ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून केवळ गणेशोत्सवाला लक्ष्य करून त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे आणि बदनाम करणे योग्य नाही. वर्षभर शहरात निघणाऱ्या सर्व धार्मिक-सामाजिक मिरवणुकांतील ध्वनियंत्रणेसाठी एकच कायदा आणि समान नियम असले पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रशासनाने आचारसंहिता ठरवावी, तिचे गणेश मंडळे निश्चितपणे पालन करतील, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना मांडली.
पोलिस आयुक्तांनी गणेशोत्सवातील ध्वनियंत्रणेबाबत केलेले विधान दिशादर्शक आहे. ध्वनियंत्रणेचा अतिरेक कमी झालाच पाहिजे. गणेशोत्सव हा केवळ विसर्जन मिरवणुकीपुरता मर्यादित नाही. दहा दिवसांचे धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक देखावे, त्यासाठी मंडळांकडून महिनोन्महिने केली जाणारी तयारी आणि सामाजिक उपक्रम यांचीही चर्चा झाली पाहिजे. गणेश मंडळे प्रशासनाच्या बरोबरीने अनेक सामाजिक कामे करतात. परिसरातील नागरिक आणि समाजाला एकत्र आणण्याचे कामही मंडळांकडून केले जाते. मात्र, या सर्व विधायक बाजू दुर्लक्षित करून केवळ शेवटच्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीतील आवाजावर चर्चा केंद्रित झाली आहे.
मागील काही दिवसांत गणेशोत्सवात स्पीकरवर बंदी आणा, ढोल-ताशा नको, गणेश मंडळांकडून पुणेकरांना वेठीस धरले जात आहे, अशा स्वरुपाची विधाने केली जात आहेत. एकप्रकारे, संपूर्ण गणेशोत्सवच ध्वनिप्रदूषणासाठी जबाबदार असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. हे चुकीचे असून, गणेशोत्सवाला बदनाम करण्याचा हा प्रकार थांबला पाहिजे. पुण्यातील ढोल-ताशा पथकांमध्ये हजारो तरुण-तरुणी सहभागी होतात. हे सर्व पुणेकरच आहेत. त्यामुळे ढोल-ताशा पथके पुणेकरांना वेठीस धरतात, अशी सरसकट विधाने करणे योग्य नाही. गणेशोत्सव ही पुण्याची अस्मिता आहे.
पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जगभरात ओळख मिळाली आहे. त्यामुळे उत्सवातील एखाद्या समस्येवर नियंत्रण आणताना संपूर्ण उत्सवालाच दोषी ठरविण्याची भूमिका योग्य नाही. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आला की, मंडपाचा आकार कमी करा, देखावे लहान करा, मूर्तीची उंची कमी करा, ध्वनियंत्रणा बंद करा, अशा विविध मागण्या पुढे येतात. प्रशासन आणि पोलिसांनी निश्चित केलेल्या नियमांचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत. उत्सव शिस्तीतच झाला पाहिजे; पण त्याचबरोबर तो दिमाखात, उत्साहात साजरा होण्याचीही गरज असल्याचे घाटे यांनी नमूद केले.
सर्वांना एकच न्याय हवा
शहरात वर्षभर विविध धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका निघतात. त्यामध्येही ध्वनियंत्रणा वापरली जाते. त्यामुळे नियम केवळ गणेशोत्सवापुरते न ठेवता सर्व मिरवणुकांसाठी समान असावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे सर्वांनी पालन केले पाहिजे. प्रशासनाने स्पष्ट आचारसंहिता तयार करावी. गणेश मंडळेही तिचे पालन करतील. मात्र, 'केवळ गणेशोत्सवातच स्पीकर वाजतात, अशा पद्धतीने वातावरण तयार करणे चुकीचे असल्याचे घाटे यांनी सांगितले.