

पुणे: मेफेड्रॉन (एमडी) विक्री करणाऱ्या भावांच्या कारनाम्याचा मार्केटयार्ड पोलिसांनी पर्दाफाश केला. हे दोघे घरातून अमली पदार्थ, दारूची विक्री करत होते. आनंदनगर वसाहतीतील घरातून सुरू असलेल्या या ड्रगच्या धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून १२५ ग्रॅम एमडी जप्त केले. या एमडीची किंमत २५ लाख रुपये असून, दारू, शस्त्रे आणि अन्य साहित्य असा एकूण २५ लाख १८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईत ओम कुंडलिक गायकवाड (वय २५) याला अटक करण्यात आली असून, त्याचा भाऊ यश गायकवाड फरार आहे. मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार मेहबूब नदाफ यांना गायकवाड बंधू घरातून अमली पदार्थ आणि अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पथकाने छापा टाकून मेफेड्रॉन, १० हजार ४०० रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, तलवार, कुऱ्हाड, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि रोकड आढळून आली. यश गायकवाडचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित जगताप, पोलिस निरीक्षक सुनीता नवले, पोलिस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे, अंमलदार दत्तात्रय राऊत, कौस्तुभ जाधव, गोरखनाथ चिनके, मेहबूब नदाफ, महेश जेधे यांच्यासह मार्केटयार्ड पोलिसांच्या पथकाने केली.