

नारायणगाव: गेल्या आठ दिवसांपासून टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्या टोमॅटोला किलोला अवघा ७ ते १० रुपये बाजारभाव मिळत असून, या दरात तोडणी, पॅकिंग आणि वाहतूक खर्चही भागत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
जुन्नर-आंबेगाव तालुका टोमॅटो उत्पादनाचा प्रमुख पट्टा म्हणून ओळखला जातो. दर वर्षी उन्हाळी, तसेच पावसाळी हंगामात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली जाते. जुलै-ऑगस्टमध्ये चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र, यंदा अपेक्षेच्या विपरीत बाजारभावात मोठी घसरण झाल्याने उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक टोमॅटो बागांचे नुकसान झाले. त्यातच पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. तोडणीला आलेला मोठ्या प्रमाणातील माल खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांना टोमॅटो शेतातच टाकून द्यावा लागत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या शेतात लाल चिखलाचे चित्र दिसत आहे.
पिंपळगाव येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी विकास खांडगे म्हणाले, की दर वर्षी जुलैमध्ये चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने गावठी टोमॅटोची लागवड करतो. मात्र, यंदा अतिपावसामुळे संपूर्ण बाग खराब झाली. त्यामुळे लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व टोमॅटो व्यापारी सारंग घोलप यांनी सांगितले, की जोरदार पावसामुळे टोमॅटोचे पीक आणि फळांचे मोठे नुकसान झाले. तसेच, इतर भागांतून चांगल्या दर्जाच्या टोमॅटोची आवक होत असल्याने जुन्नर तालुक्यातील टोमॅटोला तुलनेने कमी भाव मिळत आहे.
बाजार समितीचे सभापती संजय काळे म्हणाले, की नारायणगाव टोमॅटो मार्केटमध्ये दररोज २५ ते ३० हजार क्रेट टोमॅटोची आवक होत आहे. अधिकचा पाऊस आणि इतर भागांतून वाढलेली आवक यामुळे बाजारभावात घसरण झाली आहे. मात्र, नव्याने लागवड केलेल्या बागा चांगल्या स्थितीत असून, आगामी काळात बाजारभाव सुधारण्याची अपेक्षा आहे.