Pune Ganeshotsav: ढोल-ताशांच्या गजरात पुण्यनगरी गणेशमय; मानाच्या गणरायांचे दिमाखात आगमन!

‘मोरया’च्या जयघोषाने शहर दुमदुमले; रांगोळ्या, फुलांची सजावट अन् भक्तांच्या गर्दीत बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना
Pune Ganeshotsav
Pune GaneshotsavPudhari
Published on
Updated on

पुणे: ढोल-ताशांचा दणदणाट... 'मोरया'चा गगनभेदी जयघोष... रांगोळ्या आणि फुलांनी सजलेले मिरवणूक मार्ग... दिमाखदार रथ-पालख्यांमधून मार्गस्थ होणाऱ्या गणरायाच्या मिरवणुका अन् बाप्पाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोटलेला भक्तसागर... अशा मंगलमय आणि चैतन्यपूर्ण वातावरणात सोमवारी लाडक्या गणरायाचे पुण्यनगरीत आगमन झाले. गणेश चतुर्थीच्या मांगल्यदायी मुहूर्तावर घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना झाली अन् पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाच्या आनंदसोहळ्याची नांदी झाली.

Pune Ganeshotsav
Maharashtra Property Registration: महाराष्ट्राच्या मालमत्ता बाजाराला तेजी; ५ महिन्यांत २१.२३ लाख नोंदणी व्यवहार, महसुलात १६ टक्के वाढ

लाडक्या बाप्पाच्या आगमनाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या पुणेकरांचा उत्साह सोमवारी सकाळपासूनच ओसंडून वाहत होता. पहाटेपासून प्रतिष्ठापनेचा मुहूर्त असल्याने अनेक कुटुंबांनी सकाळीच गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. आरतीचा निनाद, धूप-दीपाचा सुगंध आणि 'मोरया'च्या जयघोषामुळे घराघरांत भक्तिमय वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे, पुण्याच्या गणेशोत्सवाची शान असलेल्या मानाच्या गणपतींसह प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुकांनी मध्यवर्ती शहर अक्षरशः दुमदुमून गेले.

Pune Ganeshotsav
Pune Ukadiche Modak: पुण्याचा उकडीचा मोदक सातासमुद्रापार! सिंगापूर, लंडन, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत ६० हजार मोदकांची मागणी

सकाळी ८ पासूनच मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. ढोल-ताशा पथकांचे दमदार वादन आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे मिरवणुकांमध्ये वेगळेच चैतन्य संचारले होते. मानाच्या गणपतींच्या मिरवणुका पारंपरिक मार्गावरून मोठ्या दिमाखात मार्गस्थ झाल्या. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तर फुलांच्या सजावटीने मिरवणूक मार्ग खुलून दिसत होते.

Pune Ganeshotsav
Pune Rainfall 2026: देश दुष्काळाच्या सावटात, पण पुणेकर भाग्यवान! जुलैच्या २४९ टक्के पावसाने धरणे भरली

पारंपरिक वेशभूषेतील ढोल-ताशा पथकांच्या तालावर पुणेकरही ठेका धरत होते. काही मंडळांनी पालखीतून, तर काहींनी आकर्षक रथातून गणरायाची मिरवणूक काढत परंपरेचे दर्शन घडवले. बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी मिरवणूक मार्गांवर आबालवृद्धांची गर्दी उसळली होती.

Pune Ganeshotsav
Pune Ganeshotsav Police Action: गणेशोत्सवात ७०१ सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांचा दणका; प्रवेश आणि मिरवणुकीत सहभागी होण्यास बंदी

हात जोडून दर्शन घेणारे भाविक, मोबाईलमध्ये सोहळा टिपणारे तरुण आणि ढोल-ताशांच्या तालावर भारावलेले गणेशभक्त यामुळे अवघी पुण्यनगरी गणेशमय झाली. 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात गणराय विराजमान झाले आणि पुढील उत्सवी दिवसांच्या आनंदपर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news