

पुणे: गणेशोत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. परिमंडळ दोनच्या हद्दीतील विविध पोलिस ठाण्यांच्या अभिलेखावर असलेल्या ७०१ सराईत गुन्हेगारांना गणेशोत्सव काळात संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश आणि वास्तव्य करण्यास व गणेशोत्सवातील सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुकीत सहभागी होण्यासही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
गणेशोत्सवात प्रमुख रस्ते, चौक, मंडई परिसर, गणेश मंडळांचे परिसर तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मोठी गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडू नयेत, तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
परिमंडळ दोनमध्ये स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ आणि आंबेगाव या सात पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ११५ जणांवर कारवाई केली आहे.
बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ प्रत्येकी १०४, सहकारनगर आणि आंबेगाव प्रत्येकी १०१, स्वारगेट १००, तर मार्केट यार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये हत्यारांचा वापर, मारहाण, दुखापत, गंभीर दुखापत, धमकी, चोरी, दंगल, जबरी चोरी, दरोड्याची तयारी तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये अभिलेखावर असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
गर्दीच्या ठिकाणी 'वॉच'
गणेशोत्सव काळात प्रमुख गणेश मंडळे, गर्दीची ठिकाणे, मिरवणूक मार्ग, चौक आणि संवेदनशील भागांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. संशयास्पद हालचालींसह पूर्वीच्या गुन्हेगारी अभिलेखावरील व्यक्तींकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी स्थानिक पोलिसांकडून विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.