

पुणे: वाढत्या वायू प्रदूषणावर आळा घालण्यासाठी आणि वृक्षतोड कमी करण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने शहरात पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार पद्धतीचा अवलंब वाढविण्यावर भर दिला असून, नागरिकांनी पारंपरिक लाकूड जाळण्याऐवजी विद्युत व गॅस दाहिनीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार पद्धतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पारंपरिक लाकूड जाळून अंत्यसंस्कार करण्याऐवजी विद्युत व गॅस दाहिनीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीसाठी सुमारे 300 ते 350 किलो लाकूड लागते, ज्यामुळे वृक्षतोड वाढते. मात्र, पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब केल्यास ही वृक्षतोड टाळता येते.
पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करताना मोठ्या प्रमाणात कार्बन, धूर आणि सूक्ष्म कण वातावरणात मिसळतात. त्यामुळे श्वसनाचे आजार, हृदयविकार आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. याउलट, विद्युत व गॅस दाहिनीमुळे प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत असून, हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. या पद्धतीमुळे कार्बन फुटप्रिंट कमी होऊन हरितगृह वायूंचे उत्सर्जन घटते. तसेच अंत्यसंस्कार प्रक्रिया केवळ दोन ते तीन तासांत पूर्ण होत असल्याने वेळेचीही बचत होते.
विद्युत व गॅसदाहिनीत 51 टक्के अंत्यसंस्कार विनामूल्य
नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये विद्युत व गॅसदाहिनी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, या सुविधा सध्या विनामूल्य दिल्या जात आहेत. सध्या पुण्यात सुमारे 51 टक्के अंत्यसंस्कार या पद्धतीने होत असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली. याशिवाय, नागरिकांना सुविधा सहज शोधता याव्यात यासाठी स्मशानभूमींचे पत्ते आणि माहिती क्यूआर कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम आणि लाइफ उपक्रमांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे.
प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक
‘पुणे एअर ॲक्शन हब’च्या सदस्या शर्मिला देव यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या की, पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार ही काळाची गरज आहे. लाकूड जाळल्यामुळे होणारे प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळे या सुविधांचा अधिकाधिक वापर होणे आवश्यक आहे. या उपक्रमासाठी महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी आणि पुणे एअर ॲक्शन हबचे सहकार्य लाभले आहे.