Pune Dussehra Shopping: दसऱ्यासाठी पुणेकर सज्ज; सोन्याच्या खरेदीला वेग, झेंडूच्या फुलांना ७० रुपये किलोपर्यंत दर

सराफा बाजारात आगाऊ नोंदणीला प्रतिसाद; हलक्या वजनाच्या दागिन्यांसह सोन्याची नाणी, बारला पसंती, मार्केट यार्डात फुलांची आवक वाढली
Marigold Dussehra Shopping
Marigold Dussehra ShoppingPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीसाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफा बाजारपेठांना सोन्याची झळाळी आली असून, दागिन्यांच्या आगाऊ नोंदणीला वेग आला आहे. ग्राहकांच्या स्वागतासाठी सराफी पेढ्या सजल्या असून, यंदा कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. तसेच, दसऱ्याला घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि वाहनांच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारात फुले पाठविण्यास सुरुवात केली आहे.

Marigold Dussehra Shopping
Maharashtra Milk Collection: दुष्काळातही दूध संकलनात वाढ; राज्यात रोज १ कोटी ६२ लाख लिटरचा टप्पा

शुभमुहूर्तावर सोने खरेदी करणे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दागिन्यांसह गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मंगळसूत्र, बांगड्या, चिंचपेटी, अंगठ्यांसह हलक्या वजनाच्या आधुनिक दागिन्यांना पसंती मिळत आहे. सोन्याची नाणी, वेढणी, सोन्या-चांदीची आपट्याची पाने, अनकट डायमंड आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांनाही मागणी आहे. आगामी लग्नसराईसाठीही दागिन्यांची नोंदणी होत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी घडणावळीवर सवलतींसह विविध योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सराफी व्यावसायिकांच्या अंदाजानुसार ७० टक्के ग्राहक दागिन्यांना, तर ३० टक्के ग्राहक गुंतवणुकीसाठी सोन्याची नाणी, बार आणि वेढणीला प्राधान्य देत असल्याची माहिती देवकर ज्वेलर्सचे संचालक मयूर देवकर यांनी दिली.

Marigold Dussehra Shopping
Pune Vegetable Market Rates: पुणे मार्केट यार्डात भेंडी, मिरची, मटार महागले; टोमॅटो, फ्लॉवर स्वस्त

नारंगी-पिवळ्या झेंडूने फुलबाजार बहरला

दसऱ्याच्या स्वागतासाठी घराघरांत सुरू झालेली लगबग, पूजेसाठी झेंडूच्या फुलांची खरेदी अन्‌ सजावटीसाठी हार-तोरणांना वाढलेली मागणी... यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजार नारंगी-पिवळ्या झेंडूने बहरला आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या खरेदीला उधाण आले असून, ग्राहकांसह किरकोळ विक्रेत्यांची वर्दळ वाढली आहे. झेंडूसह शेवंती, गुलछडी आणि ॲस्टरलाही चांगला उठाव मिळत आहे.

Marigold Dussehra Shopping
Pune Fruit Market Rates: पुण्यात लिंबाचे दर घसरले; डाळिंब, सफरचंद महागले

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि वाहनांच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारात फुले पाठविण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यासह सोलापूर, सातारा, तसेच मराठवाड्यातील बीड आणि लातूर परिसरातून झेंडूची आवक होत आहे. यामध्ये नारंगी, पिवळा, कलकत्ता आणि तुळजापुरी कापरी झेंडूचा समावेश आहे. सणासुदीच्या मागणीमुळे घाऊक बाजारात झेंडूला दर्जानुसार प्रतिकिलो ३० ते ७० रुपये दर मिळत आहेत. शेवंती, गुलछडी आणि ॲस्टरच्या दरातही तेजी आहे. दुष्काळामुळे उत्पादनातील घटीचा परिणाम आवकेवर होत असला, तरी दसऱ्याच्या खरेदीमुळे फुलबाजारातील उलाढालीला चालना मिळाली आहे.

Marigold Dussehra Shopping
Pune Market Rates: पुण्यात साखर, गूळ महागले; ज्वारी, बाजरीच्या दरातही तेजी

दसरा हा सोने खरेदीसाठी अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. यंदा ग्राहकांकडून कमी वजनातील आकर्षक दागिन्यांना विशेष पसंती मिळत आहे. त्याचबरोबर भविष्यातील गुंतवणूक म्हणून सोन्याची नाणी आणि वेढणी खरेदी करण्याकडेही कल दिसून येत आहे. आगाऊ नोंदणीला मिळणारा प्रतिसाद पाहता दसऱ्याच्या दिवशी सराफा बाजारात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.

श्रीप्रसाद पंडित, सराफा व्यावसायिक, न्यू श्रीकृपा ज्वेलर्स

दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांची खरेदी वाढली आहे. यंदा दुष्काळजन्य परिस्थितीचा फटका फुलशेतीला बसला आहे. पाण्याअभावी उत्पादन घटले असून, फुलांच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च वाढला असताना अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत दसऱ्याच्या निमित्ताने फुलांना मिळणारे चांगले दर उत्पादकांसाठी काहीसे दिलासादायक ठरत आहेत.

सागर भोसले, फुलव्यापारी, मार्केट यार्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news