

पुणे: देशातील तस्करीविरोधी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (रेव्हेन्यू इंटेलिजन्स-डीआरआय) उपसंचालकाला थेट दाऊद इब्राहिम टोळीचे नाव घेऊन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दुबईहून आणलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलची सीमाशुल्क विभागाकडून जप्ती झाल्यानंतर ते सोडवून देण्याचा दबाव टाकण्यात आला. मात्र, मागणी धुडकावून लावल्यानंतर आरोपीने उपसंचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला.
याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुश्ताक शेख आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनाच गुन्हेगारी टोळ्यांच्या नावाने धमकावण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पुणे विभागीय कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. ३ जून रोजी ते मूळगावी जात असताना आरोपीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून स्वतःला 'खबऱ्या' म्हणून काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे सुरुवातीला त्याच्यावर संशय घेतला गेला नाही. मात्र, दोन दिवसांनी आरोपीने पुन्हा संपर्क साधत दुबईहून भारतात आणलेले लॅपटॉप आणि मोबाईल मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने जप्त केल्याचे सांगितले. ते सामान अधिकाऱ्यांमार्फत सोडवून देण्याची मागणी त्याने केली. उपसंचालकांनी त्यास कोणतीही मदत करण्यास नकार दिल्यानंतर आरोपीचा खरा चेहरा समोर आला.
दि. ६ जून रोजी पहाटे आरोपीने व्हॉईस नोट पाठवून थेट धमकावण्यास सुरुवात केली. “तुमच्या माहितीमुळे माझ्या साथीदारांवर कारवाई झाली. मी गेली ३० वर्षे तस्करीच्या व्यवसायात आहे. माझे गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहेत. तुम्हाला धडा शिकवतो. तुम्ही आणि तुमचे कुटुंब पुण्यातून कसे बाहेर पडता ते पाहतो,” अशी उघड धमकी देण्यात आली. इतक्यावरच न थांबता आरोपीने त्याच दिवशी पुन्हा संपर्क साधून स्वतःचे संबंध कुख्यात फरार गुंड दाऊद इब्राहिमच्या टोळीशी असल्याचा दावा केला.
“मी दाऊद इब्राहिम टोळीसाठी काम करतो. गेली ३० वर्षे माझे त्यांच्याशी संबंध आहेत,” असे सांगत त्याने भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यालाच अशा प्रकारे धमकावण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपीने दाऊद टोळीचे नाव केवळ दहशत निर्माण करण्यासाठी वापरले की त्यामागे खरोखरच काही गुन्हेगारी साखळी आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. विमानतळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.