पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानच्या गुप्तहेर महिलेला देशाची संवेदनशील माहिती देणार्या डीआरडीओचा संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावरील सुनावणी 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हा जामीन अर्ज दाखल करण्यात आला.
त्याने अॅड. ऋषीकेश गानू यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून या प्रकरणात कुरुलकरची चौकशी सुरू आहे. जी माहिती पाठविण्याचा आरोप करण्यात आला आहे. ती सर्व माहिती सर्वत्र उपलब्ध आहे. तसेच एटीएसने सर्व इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त केला आहे. त्याबाबतची माहिती त्यांना दिली आहे. दरम्यान, विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी गानू यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर म्हणणे दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे.
याप्रकरणी एटीएसच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या व्हॉइसलेअर सायकॉलॉजिकल टेस्टच्या अनुषंगाने आज न्यायालयात युक्तिवाद झाला. त्यावर अॅड. गानू यांनी या प्रकरणात जून महिन्यात व्हाइसलेअर टेस्टचा अर्ज आला असल्याचे सांगताना त्यानंतर आरोपत्र दाखल झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. परंतु, सरकारी वकील फरगडे यांनी याला विरोध करताना गुन्ह्याचा तपास अद्याप बाकी असल्याचे व या टेस्टमुळे तपासात आणखी बाबी उघड होण्याबाबतचे मुद्दे लेखी युक्तिवादात स्पष्ट केले आहेत.
जे लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे. यामध्ये मोबाईलमधील काही अॅप ओपन होत नाही. ते गुजरात फॉरेंन्सिक लॅबला पाठवायचे आहे. तसेच तो तपासात सहकार्य करत नाही. त्या दृष्टीने तपास करण्यासाठीदेखील व्हाइसलेअर टेस्ट महत्त्वाची आहे. डिलिट केलेला डाटाही परत मिळवायचा आहे. कुरुलकर तपासात बर्याचशा गोष्टी लपतोय त्यासाठी कुरुलकरच्या सहमतीची गरज नसल्याचा युक्तिवाद फरगडे यांनी केला.
हेही वाचा