

Pune DJ protest
पुणे, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवात डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या वापराला विरोध दर्शवणारे विद्यानंद बापट यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्यांच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी विद्यानंद बापट यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली असून, त्यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. सुरक्षेची गंभीर दखल घेत बापट यांनी आज निघणाऱ्या डीजेविरोधी मोर्चात प्रत्यक्ष सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्यांच्या डीजेमुक्तीच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी बघ्यांची तसेच स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले असून बापट यांच्या निवासाभोवती कडक पहारा ठेवण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी विद्यानंद बापट यांच्या घरी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि त्यांच्याशी चर्चा केली. कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण होऊ नये आणि स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करता बापट यांनी आजच्या मोर्चात सहभागी न होण्याचा मार्ग निवडला आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
बापट प्रत्यक्ष मोर्चात उपस्थित राहणार नसले, तरी त्यांच्या या लढ्याला पुणेकरांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. बालगंधर्व चौक ते पुणे महानगरपालिकेदरम्यान आयोजित या डीजेविरोधी आणि ध्वनीप्रदूषणविरोधी मोर्चात सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संस्था किती मोठ्या संख्येने उतरतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.