पुणे जिल्हा बँकेस कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार प्राप्त
पुणे; पुढारी वृत्तसेवा : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणारा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नाशिक येथे माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभु आणि राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते शनिवारी (दि.9) दुपारी झालेल्या कार्यक्रमात पुणे जिल्हा बँकेस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे, संचालक प्रविण शिंदे, बँकेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय टापरे यांच्यासह संजय शितोळे, समीर रजपुत, गिरीश जाधव आदी अधिकार्यांनी हा पुरस्कार स्विकारला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचे संचालक मंडळ व प्रशासन उत्तम कामगिरी करीत आहे. यामुळे पुणे जिल्हा बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा गोवला गेला असून या पुरस्कारात बँकेंशी संबंधित सर्व घटकांचा वाटा असल्याची माहिती बँकेंचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी कळविली आहे.
हेही वाचा