कोल्हापूरच्या सुपुत्राकडून जगभरातील राष्ट्रप्रमुखांचे स्वागत | पुढारी

कोल्हापूरच्या सुपुत्राकडून जगभरातील राष्ट्रप्रमुखांचे स्वागत

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अतिथ्यशीलतेच्या मातीत कोल्हापूरचा डंका जगभर आहे. याच साखळीत शनिवारी (दि. 9) नवा दुवा जोडला गेला. कोल्हापूरचे सुपुत्र आणि भारतीय वायू दलाचे अधिकारी अभय परांडेकर यांना जी-20 परिषदेच्या निमित्ताने भारतात आलेल्या जगभरच्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी मिळाली. यानिमित्ताने कोल्हापूरच्या अतिथ्यशीलतेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.

जागतिक स्तरावर भारताचा वेगळा ठसा उमटविणार्‍या जी-20 परिषदेच्या निमित्ताने भारताचे वैश्विक नेतृत्व सिद्ध होत आहे. या महत्त्वपूर्ण परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांच्यासह विविध राष्ट्रांचे प्रमुख आवर्जून उपस्थित आहेत. त्या सर्व राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्याची जबाबदारी कोल्हापूरचे सुपुत्र, भारतीय वायू दलात एअर कमोडोर पदावर असलेले अभय परांडेकर यांच्यावर होती.

परांडेकर यांनी आयुष्यातील अत्यंत बहुमानाचे क्षण शनिवारी दिवसभर अनुभवले. वायू दलातील नेहमीच्या अत्यंत जबाबदारीच्या धकाधकीतून सौजन्यपूर्ण स्वागताचा हा ओलावा त्यांनी दिवसभर अनुभवला. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून नवी दिल्लीत राष्ट्रप्रमुखांचे आगमन सुरू झाले आणि क्षणभराचीही उसंत न घेता, एकापाठोपाठ येत असलेल्या या पाहुण्यांचे परांडेकर यांनी स्वागत केले. परांडेकर यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अ‍ॅल्बर्टो एंजल फर्नांडिस, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, बि—टनचे पंतप्रधान ऋषी सुनाक, सौदी अरेबियाचे मोहम्मद बिन सलमान यांच्यासह जी-20 परिषदेसाठी आलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांसह परदेशी शिष्टमंडळांचे स्वागत परांडेकर यांनी केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दिल्ली विमानतळावर दाखल झाले. यावेळी सॅल्यूट करत परांडेकर यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे स्वागत केले. परांडेकर यांनी सॅल्यूट करताच बायडेन यांनीही त्यांना सॅल्यूट करत हस्तांदोलन केले.

अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्याची संधी मिळणे, हा आजवरच्या सेवेतील अतिशय दुर्मीळ क्षण आहे. राष्ट्राध्यक्ष व परदेशी शिष्टमंडळांना भेटण्याची खूप मोठी संधी यानिमित्ताने मला मिळाली.
– अभय परांडेकर, एअर कमोडोर

Back to top button