

खेड: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या राजगुरुनगर शहरात एक भयानक घटना घडली. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेला पुष्कर दिलीप शिंगाडे विद्यार्थी मृत पावला असल्याची प्राथमिक माहिती खेडचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली.
शहरातील गजबजलेल्या वाडा रस्त्या नजीकच्या पाण्याच्या टाकी जवळ खासगी क्लास मध्ये सोमवारी (दि. १५) सकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांना या पार्श्वभूमीवर धक्का बसला. दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेत शिकत आहेत. किरकोळ वादातून हा प्रकार घडला असावा, असे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याने चाकूने सपासप वार केले, ज्यामुळे जखमी पुष्करला गंभीर इजा झाल्या.
घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ला करणारा विद्यार्थी आणि त्याच्या साथीदाराने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुष्करला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे राजगुरुनगर शहरात खळबळ उडाली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिक तपास करत असून, नेमके कारण आणि इतर तपशील लवकरच स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
अशा घटना टाळण्यासाठी शाळांमध्ये तसेच घटना घडलेल्या खाजगी क्लास मध्ये किंवा बाहेरच्या परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.