

सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व जागी विजय मिळविल्यानंतर आता कारखान्याचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. अनुभवी नेतृत्वाला पुन्हा संधी मिळणार की, तरुण चेहऱ्यांकडे कारखान्याची धुरा सोपविली जाणार, याबाबत कार्यक्षेत्रात चर्चा सुरू आहे. राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, शैलेश रासकर आणि सुनील भगत यांच्या नावांची चर्चा आहे. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार आहेत.
कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले होते, तर युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनेही निवडणुकीत आव्हान दिले होते. मात्र, सभासदांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला स्पष्ट कौल दिला. आता पदाधिकारी निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तरुण नेतृत्वाला संधी मिळणार?
युवा नेतृत्व म्हणून निंबुतचे अभिजित काकडे आणि करंजेपूलचे ऋषिकेश गायकवाड यांच्या नावांचीही चर्चा आहे. दोघांचीही ही दुसरी संचालक टर्म आहे. तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय झाल्यास त्यांच्या नावांचा विचार होऊ शकतो. अभिजित काकडे यांचे जय पवार यांच्याशी असलेले निकटचे संबंधही राजकीय चर्चेत आहेत. ओबीसी चेहरा म्हणून नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे आणि कोऱ्हाळे येथील चार वेळा संचालक राहिलेले सुनील भगत यांच्या नावांचीही चर्चा आहे. मात्र, यापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
अनुभवी की तरुण नेतृत्व?
अध्यक्षपदाच्या चर्चेत ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी यापूर्वी दोन वेळा कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले आहे. संचालक म्हणून त्यांची ही चौथी टर्म आहे. सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव, कारखान्याच्या कामकाजाची जाण आणि सभासदांशी असलेला संपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे यांचे नावही चर्चेत आहे. त्यांनी दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. कारखान्याचे संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. प्रशासकीय अनुभव आणि शेतकऱ्यांशी असलेला संपर्क यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
उपाध्यक्षपद, स्वीकृतबाबतही उत्सुकता
अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्षपदाच्या निवडीकडेही सभासदांचे लक्ष आहे. कारखान्याच्या पाच गटांतील संचालकांना टप्प्याटप्प्याने उपाध्यक्षपदाची संधी देण्याची परंपरा कायम राहणार का? निवडणुकीपूर्वी विविध राजकीय समीकरणे जुळविताना अनेक इच्छुकांना संधी देता आली नसल्याने स्वीकृत संचालकपदासाठीही चुरस असणार आहे. कारखान्यातील दोन स्वीकृत संचालकांच्या जागांवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता आहे. विक्रम भोसले हे सध्या खरेदी-विक्री संघाचे संचालक असून, त्यांचे तेथील पद रिक्त होणार असल्याने त्या ठिकाणीही नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते.