बावडा: सध्या बाजारामध्ये पेरूचा भाव प्रतिकिलोस रु. 30 ते 35 एवढा खाली घसरला आहे. तसेच, दुष्काळामुळे पेरूच्या उत्पादनात व आकारामध्ये घट झाली आहे. परिणामी, पेरू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामुळे बाजारामध्ये मागणी वाढून पेरूचे भाव प्रतिकिलो रु. 100 ते 120 पर्यंत पोहचले होते. मात्र, सध्या मागणी कमी झाल्याने व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंदीचे वातावरण असल्याने पेरूचे भाव घसरले आहेत, अशी माहिती पेरू उत्पादक शेतकरी प्रदीप (गणेश) पांडुरंग देवकर (वडापुरी) यांनी दिली. सध्या प्रदीप देवकर यांच्या एक एकर क्षेत्रावरील तैवान पिंक पेरूची काढणी सुरू आहे. मात्र, अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
इंदापूर तालुक्यात चालू दशकामध्ये पेरू पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामध्ये तैवान पिंक वाणाच्या पेरूची लागवड मोठ्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी केली आहे. पेरू हा नाशवंत माल असल्याने जास्त दिवस राहत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावाने विकावा लागतो, अशी माहिती पेरू उत्पादक शेतकरी भारत लाळगे (सराफवाडी), अभिजित शिंदे (शेटफळ हवेली), विलास ताटे देशमुख (निरा नरसिंहपूर) यांनी दिली.
एक एकर क्षेत्रातून तैवान पिंक वाणाच्या पेरूचे सुमारे 20 टन पेरूचे उत्पादन अपेक्षित होते. आजअखेर 6 टन पेरूचे उत्पादन निघाले आहे. आणखी सुमारे 6 टन एवढे उत्पादन निघेल. दुष्काळी परिस्थितीमुळे पेरूचा आकार लहान आल्याने सुमारे 7 ते 8 टन उत्पादनाचा फटका बसेल.
प्रदीप देवकर, शेतकरी