Pune Crime News : दाम्पत्यावर हल्ला; गुंड टोळीवर मोक्का

Pune Crime News : दाम्पत्यावर हल्ला; गुंड टोळीवर मोक्का

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमध्ये दाम्पत्यावर हल्ला करणार्‍या गुंड मंगेश तांबे याच्यासह साथीदारांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. टोळीप्रमुख मंगेश बाळासाहेब तांबे (वय 28, रा. खराडकरनगर, खराडी), अक्षय कुंदन गागडे (वय 24), कार्तिक भरत गुमाणे (वय 20, दोघे रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत.

याबाबत एका तरुणाने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुण आणि त्याची पत्नी गेल्या महिन्यात मुंढवा भागातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. आरोपी मंगेश तक्रारदार तरुणाच्या ओळखीचा आहे. उपाहारगृहात बिल देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्या वेळी मंगेश आणि साथीदार अक्षय, कार्तिक यांनी तरुणाच्या डोक्यात बाटली फोडली. त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. तरुणाच्या पत्नीला धक्काबुक्की केली. आरोपींनी उपाहारागृहात दहशत माजवून कामगारांसह ग्राहकांना शिवीगाळ केली होती.

मंगेश आणि साथीदारांविरुद्ध खंडणी, शस्त्र बाळगणे, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे खडक, बंडगार्डन आणि मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल आहेत. मंगेशसह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी तयार केला. संबंधित प्रस्तावर अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ पाचचे उपायुक्त आर. राजा यांच्याकडे सादर केला. संंबंधित प्रस्तावित मंजुरीसाठी पोलिस आयुक्तांकडे पाठविण्यात आला. पोलिस आयुक्तांनी तांबेसह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. रितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गेल्या वर्षभरात आतापर्यंत शहरातील 107 गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news