मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– नवीन मोटार वाहन कायद्याविरोधातील आंदोलनात पानेवाडी, नागापूर परिसरातील इंधन कंपन्यांमधून धावणाऱ्या टँकर, ट्रकचालकांनी सहभाग घेतला आहे. इंधन व गॅसची वाहतूक करणारे तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त टँकर एका जागी खिळल्याने राज्यातील विविध भागांत होणारा इंधनपुरवठा ठप्प झाला आहे. दरम्यान, या प्रकल्प स्थळांजवळ ट्रक, टँकरचालकांनी घोषणाबाजी करत नवीन कायदे मागे घेण्याची मागणी केली.
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार रस्ते अपघातप्रसंगी मदत न करता पळ काढल्यास १० लाखांचा दंड आणि ७ वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. त्यास मालवाहतूकदारांनी आक्षेप घेतला आहे. अपघातस्थळी बहुतांश वेळा जमाव आक्रमक होऊन वाहनचालकांना आणि वाहनांना लक्ष करतात, त्यांच्यापासून बचावासाठी चालकांना सुरक्षितस्थळी जाणे भाग पडते, असा मुद्दा उपस्थित करत वाहनचालकांनी हा कायदा मागे घेण्याची मागणी करत सोमवार (दि. १)पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यात मनमाडपासून जवळच असलेल्या पानेवाडी, नागापूर परिसरातील इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनीतून इंधन आणि गॅस सिलिंडरची वाहतूक करणारे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त टँकर आणि ट्रकचालकांनी सहभाग घेतला आहे. एरवी या परिसरात या वाहनांची वर्दळ असते. परंतु, सोमवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. या संपामुळे राज्याच्या विविध भागांतील इंधनपुरवठा ठप्प होऊन इंधनटंचाईची समस्या उभी ठाकली आहे.
हेही वाचा :