Pune : महावितरणची नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार | पुढारी

Pune : महावितरणची नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे. नवीन वीजजोडणीसाठी नवीन सेवा जोडणी योजनेचा पर्याय ग्राहकांना सर्वप्रथम देण्यात यावा तसेच कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत सेवा देण्यात यावी, असे निर्देश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

कृषिपंप वगळून नवीन वीजजोडण्या देण्यासाठी नवीन सेवा जोडणी नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा तसेच समर्पित वितरण सुविधा अशा तीन योजना अस्तित्वात आहेत. यामध्ये वीजग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी नवीन सेवा जोडणी योजना अतिशय महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत नवीन वीजजोडणी देणे किंवा वीज भार कमी अधिक करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधांची व यंत्रणेची कामे महावितरणकडून करण्यात येतील. त्यासाठी ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही. तर केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल.

सध्या तिन्ही योजनांद्वारे महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी महावितरण अधिकार्‍यांकडून फक्त समर्पित वितरण सुविधा योजनेचा पर्याय देण्यात येत असल्याचे निर्दशनास आले आहे.
भार वाढवणे/कमी करण्याचे अर्ज नवीन सेवा जोडणी किंवा नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा योजनेमध्ये स्वीकारले जातील. या दोन्ही योजनांऐवजी समर्पित वितरण सुविधा योजनेचा पर्याय निवडणार्‍या ग्राहकांकडून तसा लेखी अर्ज घेऊनच त्यामध्ये कामे करण्याचे निर्देश महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

हेही वाचा

Back to top button