

पुणे: केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यासाठी १३ लाख मेट्रिक टनाइतका साखरेचा कोटा खुला केला आहे. गतवर्षातील हंगामाअखेरचा साखरेचा शिलकी साठा कमी असून, नवीन हंगामात साखर कारखाने सुरू होऊन नवीन उत्पादन हाती येण्याचे प्रमाण अद्याप कमी आहे. त्यामुळे घाऊक बाजारात एस ३० ग्रेड साखरेचे दर क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढून ५५०० रुपयांवर स्थिरावले आहेत.
ऐन दिवाळीत मागणी वाढल्यास या दरात आणखी वाढीचा अंदाज घाऊक व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. देशात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून, देशाच्या एकूण साखर उत्पादनात या तीन राज्यांचाच प्रामुख्याने समावेश आहे. या ठिकाणचे साखर कारखाने अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत.
दिवाळीनंतर साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचा वेग वाढण्याची व ऊसतोडीसाठी कामगारही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील, अशी अपेक्षा आहे. ऑक्टोबरमध्ये तयार झालेल्या नवीन साखरेस नोव्हेंबरमध्ये विकण्यास परवानगी दिलेली आहे.
त्यामुळे बाजारात साखरेची आवक आणि साठा गरजेइतका असला तरी सध्या ग्राहकांची वाणवा आहे. महिनाअखेरीमुळे ही मागणी कमी असावी, असेही सांगण्यात येत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दिवाळी असल्याने मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या कारखान्यांवर साखरेच्या निविदा क्विंटलला ५ हजार ते ५१०० रुपये दराने विक्री होत आहे.
मागणी वाढताच त्यामध्ये दरवाढीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यानुसार पुढेही तेजीचाच अंदाज आहे. त्यादृष्टिने केंद्र सरकार साखर दरवाढीवर लक्ष ठेवून असून, ऐन दिवाळीत दर स्थिर ठेवण्यासाठी तत्काळ उपाययोजनेस प्राधान्य देण्याची अपेक्षा आहे. या स्थितीत साखरेचे दर पुन्हा क्विंटलला आणखी किती उसळी घेतील, हे पाहणे महत्त्वाचे राहील.