

माऊली शिंदे
वडगाव शेरी : सतत संशय, किरकोळ कारणावरून रोजची भांडणे, मानसिक तणाव, एकमेकांविषयी असणाऱ्या अवास्तव अपेक्षा, शारीरिक आजार, व्यसन अशा वेगवेगळ्या कारणांमुळे संसार तोडण्यासाठी निघालेल्या 108 जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा जुळविले आहेत. हे काम नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयातील समुपदेशक भावना मोहोड यांनी केले आहे.(Latest Pune News)
रीना आणि अनिकेत (दोघांची नाव बदलली) यांची सतत किरकोळ कारणामुळे भांडण होत होती. अनिकेतला दारूचे व्यसन होते. रीनावर चारित्र्यावरून संशय घेत होता. तिला मारहाण करत होता. मुलांचा नीट संभाळ करत नव्हता. रीनाला काम करून देत नव्हता. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र व्हायचा निर्णय घेतला होता. दरम्यान, त्यांना नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयातील समुपदेशन केंद्राची माहिती मिळाली. त्यांनतर त्यांनी कार्यालयात येऊन समुपदेशनचे सेशन घेतले. त्यानंतर त्यांच्यामध्ये समेट झाली आणि त्यांचा संसार पुन्हा सुरळीत सुरू झाला.
पोलिसांचा ‘भरवसा सेल’ तसेच वस्तीमध्ये जाऊन समुपदेशन केंद्राबाबत जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक कोटुंबिक कहल किंवा जेष्ठ नागरिक या समुपदेशन केंद्राचा लाभ घेऊ लागले आहे. समुपदेशन केंद्राकडे पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकाने संपर्क करून आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या मांडल्यानंतर विविध टप्प्यांवर जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. तसेच गरज पडल्यास कायदेशीर मदतही पुरवली जाते. वैवाहिक जीवनात अलबेल नसल्याची जाणीव झाल्यावर फक्त स्त्रियाच येथे मदत मागतात असे नाही, तर पुरुष ही या केंद्राची मदत घेत आहे. या समुपदेशन केंद्रामार्फेत महापालिकेच्या शाळेत जाऊन समुपदेशन केले जाते. कमी वयात विद्यार्थी व्यसनी होणे, मोबाईलच्या आहारी जाणे अशा वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचे काम होत आहे.
वैवाहिक जीवनातील अडचणी, व्यसना पासून सुटका, जेष्ठ नागरिकांच्या समस्यातून मार्ग काढण्यासाठी समुपदेशन केंद्राची चांगली मदत होत आहे. कौटुबिंक अडचणीसाठी नागरिकांनी नगररोड-वडगाव शेरी क्षैत्रिय कार्यालयच्या तिसऱ्या मजल्यावर समुपदेशन केंद्राला भेट द्यावी.
भावना मोहोड, समुपदेशक, कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय