

सुषमा नेहरकर-शिंदे
राजगुरुनगर : जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड या तालुक्यांसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा अधिवास वाढत आहे. बिबट्यांची पाचवी पिढी उसातच जन्माला आली, वाढली व नष्ट देखील झाली. जंगलामध्ये राहणे, जंगली प्राण्यांची शिकार करणे, या बिबट्यांच्या मूळ गुणधर्मातच बदल झाला असून, आता ऊस आणि मानवी वस्ती हेच त्याचे मूळ अधिवास झाल्याचा निष्कर्ष वन विभागाच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.(Latest Pune News)
जुन्नर वन विभागाच्या वतीने बिबट्यावर सविस्तर अभ्यास करून खास अहवाल तयार केला आहे. यामध्ये अनेक आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत. यात जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील बिबट्यांची तब्बल पाचवी पिढी अशी आहे, की जी उसातच जन्मली; त्यातच वाढली व मरण पावली.
यामुळेच मूळ जंगलामध्ये राहणे, जंगली प्राण्यांची शिकार करणे, हे नागरी वस्तीत दिसत असलेल्या बिबट्यांना माहितीच नाही. पूर्वी केवळ पाळीव प्राणी, भटकी कुत्री, कोंबड्या, पोल्ट्रीच्या मेलेल्या कोंबड्या हे खाद्य असणाऱ्या बिबट्याची नवीन शिकार लहान मुले ठरत आहेत. मानवी रक्ताची सवय लागल्यास भविष्यात मानवाचे जगणेच धोक्यात येऊ शकते.
पुणे जिल्ह्यात पहिला मानव-बिबट संघर्ष 2001 मध्ये झाला. त्यानंतर यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या बिबट्यांची पाचवी पिढी ऊस आणि मानवासोबत वाढत आहे. पूर्वी केवळ पाळीव प्राणी व भटकी कुत्री बिबट्यांची मुख्य शिकार होते. परंतु, गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात मानवावरील हल्ले वाढले आहेत. बिबट्यांचा अधिवास व मूळ गुणधर्म झपाट्याने बदलत आहे. भविष्यात बिबट आणि मानवी संघर्ष अधिक तीव होऊ शकतो.
स्मिता राजहंस, सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर वन विभाग
गेल्या काही वर्षांत बिबट्या केवळ जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड या तालुक्यांतच मर्यादेत राहिला नसून, तो थेट ऊसक्षेत्र असलेल्या दौंड, बारामती, इंदापूरपर्यंत जाऊन पोहचला आहे. पुणे शहरालगतच्या वस्तीत देखील बिबटे दिसू लागले आहेत. परंतु, शिरूरसह खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणात आहे. मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याने आणि बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. जिल्ह्यात सन 2001 मध्ये बिबट्याने पहिली मानवी शिकार केली. आत्तापर्यंत तब्बल 56 हून अधिक लोकांचा बळी बिबट्याने घेतला आहे.