

मंचर : जुन्नर वन विभागात आशिया खंडातील सर्वाधिक बिबटे असल्याचे धक्कादायक उघडकीस आले आहे. या विभागात आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर हे चार तालुके येतात. वन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या (नाव न छापण्याच्या अटीवर दिलेली माहिती) म्हणण्यानुसार, येथे सुमारे एक हजार प्रौढ बिबटे आणि तीनशे ते चारशे बछडे आहेत. या आकड्यामुळे राज्यासह देशभरात चिंता व्यक्त होत असून, ग्रामीण भागात मानव-बिबट संघर्ष गंभीर स्वरूप धारण करीत आहे.(Latest Pune News)
गेल्या काही महिन्यांपासून या भागात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. शेतकरी, शाळा-महाविद्यालयाला जाणारी मुले आणि रात्री प्रवास करणारे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबटे आता जंगलापुरते मर्यादित न राहता गावागावातील वाड्या, शिवार आणि रस्त्यांवर मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. काही ठिकाणी बिबट्यांच्या हालचाली कुत्र्यासारख्या सामान्य झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वन विभागाने पिंजरे लावणे, जनजागृती करणे, आणि चारा-वनक्षेत्रातील अधिवास सुधारणा यांसारखे प्रयत्न सुरू केले आहेत; मात्र समस्या सुटण्याचे नाव घेत नाही. तज्ज्ञांच्या मते, मुबलक खाद्यस्रोत, जलसाठे आणि सुरक्षित अधिवासामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम ग्रामीण जनजीवनावर होत असून, भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.
‘बिबट्यांचे संरक्षण महत्त्वाचे, पण माणसांचे रक्षण कोण करणार?’ असा सवाल स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तसेच सरकारकडे योग्य नियोजन आणि ठोस उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे. अनेक गावांमध्ये रात्री वावर बंदी लागू करण्याची वेळ आली असून, वन विभागावर तीव टीका होत आहे.
जंगल नाहीसं होतंय आणि बिबटे गावात येतायत. आता माणूस सुरक्षित नाही, शेतात काम करणंसुद्धा भीतीचं झालं आहे, असे अमोंडीचे उपसरपंच धनंजय फलके यांनी सांगितले. तर ‘प्रत्येक गावात पिंजरे लावले तरी उपयोग नाही. बिबट्यांची संख्या एवढी वाढली की आता संघर्ष टाळणे अशक्य झाले आहे,’ असे उद्योजक मोहन थोरात यांनी सांगितले.