

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असताना पवार पॅनेल आणि मोहोळ पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांत शुक्रवारी रात्री उशिरा बैठक झाली. यामध्ये समझोता करण्यात आल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे. या बैठकीत झालेल्या समझोत्यानुसार अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून सरचिटणीसपदी संजय शेटे यांची निवड करण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Latest Pune News)
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक रविवार (दि. 2 नोव्हेंबर) मुंबईत होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्ष आणि सरचिटणीस या दोन्ही पदांकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अध्यक्षपदासाठी अजित पवार यांनी अर्ज दाखल केला असून त्यांच्याविरोधात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज भरला आहे, तर सरचिटणीस पदासाठी नामदेव शिरगावकर यांनी अर्ज दाखल केला असून त्यांच्या विरोधात मुंबईचे संजय शेटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार यांना पुन्हा संधी देण्यासाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात रात्री उशिरा मुंबई येथे बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्षपदासाठी मुरलीधर मोहोळ यांनी माघार घेऊन अजित पवार यांना पुन्हा संधी द्यायची आणि त्याबदल्यात सरचिटणीस पदासाठी नामदेव शिरगावकर यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी संजय शेटे यांची वर्णी लावण्यावर बैठकीत चर्चेनंतर एकमत झाले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार, तर सरचिटणीसपदी संजय शेटे यांची वर्णी लागणार असेल तर नामदेव शिरगावकर यांची पुढील भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.