

पुणे: देशात सहकार क्षेत्रात महाराष्ट्र राज्य अग््रेासर असून, सुमारे दोन लाखांहून अधिक सहकारी संस्थांचे जाळे राज्यात कार्यरत आहे. या संस्थांसाठी आता सहकार आयुक्तालयाने एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे.
ते म्हणजे सर्व सहकारी संस्थांची नोंदणी, सावकारी परवाना आणि त्या परवान्यांचे नूतनीकरण नागरिकांना ‘आपले सरकार’ पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. एवढेच नाही तर या सेवांसाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात येऊ नयेत, अशा महत्त्वपूर्ण सूचनाही सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015अंतर्गत सहकार विभागाच्या एकूण पाच सेवा अधिसूचित केलेल्या आहेत. त्यापैकी प्रामुख्याने सहकारी संस्था नोंदणी, सावकारी परवाना देणे, सावकारी परवान्याचे नूतनीकरण या सेवा संपूर्णपणे आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामुळे याबाबतचे सर्व अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने आपले ‘सरकार पोर्टल’वर करावे लागणार आहे.
ऑनलाइन सहकारी संस्थांची नोंदणी व सावकारी परवाना देणे तसेच सावकारी परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रियाही आता ऑनलाइन पद्धतीनेच करण्याच्या सूचना राज्यातील सहकारी संस्थांचे सर्व विभागीय सहनिबंधक, सर्व जिल्हा उपनिबंधक, सर्व सहाय्यक उपनिबंधकांना (तालुका-वॉर्ड सर्व) सहकार आयुक्त तावरे यांनी दिलेल्या आहेत. या सेवांसाठी वेबसाइटवरून अर्ज करता येणार आहे.
ऑनलाइन नोंदणीमुळे होणारे लाभ
सहकार विभागाने घेतलेल्या ऑनलाइन नोंदणीच्या निर्णयामुळे यामधील मानवी हस्तक्षेप जवळपास थांबणार आहे.
सामान्यांना होणारे त्रासही कमी होऊन पारदर्शकता वाढणार आहे.
कागदपत्रे ऑनलाइनद्वारे अपलोड करण्यामुळे आता वेळेची बचत होईल
राज्यात सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांची नोंदणी, सावकारी परवाना देणे, त्यांच्या नूतनीकरणाची सेवा कार्यान्वित झालेली आहे. त्यामुळे नागरिकांसह संबंधित सहकारी संस्थांना आता घर अथवा कार्यालयात बसून आपापल्या सहकारी संस्थेचा अर्ज, कागदपत्र अपलोड करणे ही कामे ऑनलाइन पद्धतीने करता येतील.
दीपक तावरे, सहकार आयुक्त, पुणे