

पुणे: जनगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याशी वाद घालून तिचा विनयभंग केल्याची घटना गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत घडली. महिलेला हाताने, तर मुलाला दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास नवनाथ मोरे (वय 40), क्रांती विकास मोरे (वय 36), मुक्ता राजभाऊ कसबे (वय 43), लीलावती नवनाथ मोरे (वय 65), अभिजित श्रीधर मोरे (वय 26, सर्व रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांच्यासह साथीदारां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिला कर्मचाऱ्याने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला कर्मचारी 27 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत जनगणना करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी वसाहतीतील गल्ली क्रमांक 14 येथे आरोपीच्या घरात त्या गेल्या.
आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांची त्यांनी माहिती घेतली. महिलेबरोबर त्यांचा मुलगा होता. आरोपीचे वसाहतीत आणखी एक घर आहे. आरोपीने दुसऱ्या घरातील सदस्यांची नोंद करा, असे सांगितले. तेव्हा महिला कर्मचाऱ्याने त्या घराची नोंद झाली नसल्याचे त्यांना सांगितले. या कारणावरून आरोपींनी महिला कर्मचाऱ्याशी वाद घालून शिवीगाळ केली.
त्यानंतर जनगणनेच्या नोंदी पूर्ण करण्यासाठी त्या गुरुवारी (दि. 28 मे) दुपारी बाराच्या सुमारास गेल्या. भांडणाचा राग मनात धरून आरोपीने महिला आणि मुलाला शिवीगाळ केली. त्यांना मारहाण केली. महिला कर्मचाऱ्याच्या मुलाला दगडाने मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरसाट तपास करीत आहेत.