

पुणे: कौटुंबिक वादातून महिला पोलिस अधिकाऱ्याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न तिच्या पतीने केला. खडकी बाजार पोलिस वसाहतीतील अधिकारी निवासस्थानात बुधवारी (दि. 27) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती योगेश माधव बेरी (वय 38, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक महिलेने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सहायक पोलिस निरीक्षक महिला पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत (स्पेशल बॅंच) नियुक्तीस आहेत. आरोपी बेरी हा अभियंता असून, खासगी कंपनीत नोकरी करत आहे. विवाहानंतर त्यांना दोन मुले झाली.
गेल्या काही महिन्यांपासून आरोपी पती महिला पोलिस अधिकाऱ्याच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करत होता. त्याच्या छळामुळे महिला पोलिस अधिकाऱ्याने घटस्फोटाचा दावा शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता. महिला पोलिस अधिकारी खडकी बाजार पोलिस वसाहतीतील अधिकारी निवासस्थानात राहायला आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आरोपी पती वेगळा राहत होता. त्याच्याकडे वसाहतीतील घराची चावी होती. एक चावी महिला अधिकाऱ्याकडे होती. 27 मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महिला पोलिस अधिकारी घरी परतल्या. आरोपी पती घरात लपून बसला होता. तेव्हा आरोपीने महिला पोलिस अधिकाऱ्याच्या डोळ्यात राख फेकली.
ओढणीने त्यांचा गळा आवळला. महिला पोलिस अधिकाऱ्याने आरडाओरडा केला. तेव्हा वसाहतीतील रहिवाशांनी तेथे धाव घेतली. रहिवाशांनी मध्यस्थी करून पतीला पकडले. खुनाचा प्रयत्नप्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक रेणुका गालफाडे तपास करत आहेत.