Who Was Rohit Arya: मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण होता?

Swachhta Monitor Dispute Explained: पतीने दिवसरात्र काम केले, पण त्याचेच पैसे शासनाने थकवले, असा आरोप रोहित आर्यच्या पत्नीने वर्षभरापूर्वी केला होता.
Who Is Rohit Arya Image Of Accused Powai Hostage Case
Rohit AryaPudhari
Published on
Updated on

Who Was Rohit Arya Mumbai Powai RA Studio Hostage Case

ज्ञानेश्वर चौतमल, पुणे

पुणे : वेबसीरिजच्या ऑडिशनसाठी बोलावलेल्या 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या माथेफिरू रोहित आर्यचा मुंबई पोलिसांनी खात्मा केला. गुरुवारी दुपारी घडलेल्या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. माथेफिरू रोहित आर्य मूळचा पुण्याचा रहिवासी असून गेल्या दीड वर्षांपासून शिक्षण विभागाने पैसे थकवल्याचा त्याचा आरोप होता अशी माहिती समोर आली आहे. याच कारणावरून त्याने मुलांना ओलीस ठेवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा संपूर्ण वाद नेमका काय आहे, रोहित आर्य कोण होता हे जाणून घेऊया..

रोहित आर्य कोण होता?

रोहित आर्या हा मूळचा पुण्याचा रहिवासी होता. पुण्यातील एका समाजसेवकाने ऑगस्ट 2024 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यात त्याने म्हटले होते, 'कामानिमित्त नवी पेठेत गेलो असता एक व्यक्ती अत्यावस्थ अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडला होता. त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या खिशात एक कागद सापडला असून यातून तो गेल्या महिनाभरासाठी सरकारविरोधात उपोषणाला बसला होता.'

Who Is Rohit Arya Image Of Accused Powai Hostage Case
Mumbai Children Hostage: पवईत ओलीस नाट्य; ऑडिशनला आलेल्या 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या माथेफिरूचा एन्काऊंटर

पोस्टमध्ये ज्या व्यक्तीचा उल्लेख होता तो रोहित आर्य हाच होता. 2024 मधील या व्हिडिओत रोहित आर्यचा मुलगा आणि पत्नी दोघेही दिसत आहेत. रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत त्याची पत्नी ढसाढसा रडत असून पतीने दिवसरात्र काम केले, पण त्याचेच पैसे शासनाने थकवले, असा आरोप तिने केला होता.

रोहित आर्य पुण्यात कुठे रहायचा?
रोहित हा कोथरूडमधील स्वरांजली सोसायटीत रहायला होता. पुढारी न्यूजचे प्रतिनिधी गुरुवारी संध्याकाळी त्याच्या निवासस्थानी पोहोचले असता घरात कोणीही नव्हते. गेल्या 25 वर्षांपासून रोहितचे कुटुंब त्याच भागात राहत असून रोहितचे मूळ आडनाव हारोळीकर असे होते.  अनेक दिवसांपासून ते घर बंद असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

रोहित आर्यने सुरू केलेले स्वच्छता मॉनिटर हे अभियान नेमके काय होते?

प्रोजेक्ट लेट्स चेंज हा प्रकल्प रोहित आर्यने 2013 पासून सुरू केल्याचा उल्लेख स्वच्छता मॉनिटर या वेबसाईटवर आहे. याच वेबसाईटवर स्वच्छता मॉनिटर या अभियानाचीही माहिती आहे. 2022 च्या सुमारास हे अभियान सुरू करण्यात आले होते. वेबसाईटवरील माहितीनुसार, या अभियानात शालेय विद्यार्थी हे 'स्वच्छता मॉनिटर' असतील. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या किंवा थुंकणाऱ्यांना थांबवून त्यांची चूक निदर्शनास आणून द्यायची. ही चूक निदर्शनास आणून दिल्यावर अस्वच्छता करणाऱ्यांना चूक दुरुस्त करण्याची विनंती करायची. विद्यार्थ्यांनी ही संपूर्ण घटना लक्षात ठेवून घरी परतल्यावर त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि रिल्स फॉर्मेटमध्ये सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करायचा, अशी ही संकल्पना होती. याच संकल्पनेसाठी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रोहित आर्यचे कौतुक देखील केले होते. युट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.

स्वच्छता मॉनिटर अभियान आणि इतर कामाचे दोन कोटी रुपये शिक्षण विभागाने थकवल्याचा आरोप रोहित आर्यने केला होता.

अभियानात खूप गोंधळ झाला, शाळा, विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय आणि सगळे गप्प आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात विजेत्यांची निवड करताना चूक झाली असून मी याचा उघडपणे विरोध दर्शवतोय, असं रोहितने वर्षभरापूर्वी एका व्हिडिओत म्हटले होते.

Who Is Rohit Arya Image Of Accused Powai Hostage Case
Encounter | पवईत मुलांना डांबून ठेवणाऱ्या माथेफिरुचा अमोल वाघमारेंनी केला एन्काऊंटर

तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर काय म्हणाले?

गुरुवारी पवईतील ओलीसनाट्यानंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. रोहितकडे माझी शाळा सुंदर शाळा, स्वच्छता मॉनिटरचे काम देण्यात आले होते. परंतु, रोहितने काही लोकांकडून थेट पैसे घेतल्याचा विभागाचं मत होतं. हे प्रकरण रोहितने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी बोलून सोडवलं पाहिजे होते, असं केसरकर यांनी सांगितले.

विद्यमान शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रोहित आर्य प्रकरणाबाबत काय सांगितले?

राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रोहित आर्य प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, रोहित आर्यसंदर्भात विभागाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला असून उद्यापर्यंत (शुक्रवारी) सविस्तर माहिती देवू, असं भुसेंनी सांगितले.

प्राथमिक पातळीवर रोहित आर्य, अप्सरा एंटरटेंटमेंट नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मॉनिटर हे अभियान राबविणे संदर्भात दि. 14 सप्टेंबर 2022 रोजी पहिले निवेदन शासनाला प्राप्त झालेले होते, अशी माहिती भुसेंनी माध्यमांना दिली.

शिक्षण विभागाने काय स्पष्टीकरण दिले?
स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ हा उपक्रम शासनाने संमती न देता केवळ सामाजिक संस्थेच्या स्वरूपात राबविण्यात आला होता. अप्सरा मिडिया एंटरटेनमेंट नेटवर्क्स यांना शालेय शिक्षण विभाग किंवा शासनामार्फत कोणतीही मान्यता प्राप्त झालेली नाही. सदर प्रकरणी रोहित आर्या यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती शासनाशी संबंधित किंवा त्यांच्या कार्यांशी निगडित नाही, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले.

शासनाच्या कोणत्याही विभागाचा प्रकल्प राबविण्याची विहीत कार्यपध्दती असते. उदा. शासनाची त्या योजनेला मान्यता प्रकल्पाला खर्च किती असणार आहे, कार्यपध्दती, निविदा, अटी-शर्ती. आताच्या घडीला अशी कोणतीही कार्यपध्दती राबविलेली दिसत नाही.

अप्सरा मिडीया एंटरटेंटमेंट नेटवर्क संस्थेने स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरीता शाळांकडून रक्कम जमा केलेली दिसते. तसे शासनाला अपेक्षित नव्हते. सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर माहिती देण्यात येईल, असंही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news