

पुणे : भारतात ज्या उत्तमोत्तम भाषा आहेत, ज्या वाचल्या जातात, ज्या भाषेमध्ये अधिक ग्रंथ खपतात, ज्या भाषेतील साहित्य गांभीर्याने घेतले जाते, त्यात बंगाली, मल्याळम आणि मराठी भाषेचा समावेश आहे. सहा राज्यांमध्ये जवळपास हिंदी भाषिक वास्तव्यास असूनही मराठीचा व्यवहार हिंदीपेक्षा मोठा आहे. त्यामुळे मराठी भाषा ही चिरंतर काळ टिकणार आहे. तिच्या भवितव्याची चिंता कोणी करु नये, असे मत सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी गुरुवारी (दि.30) व्यक्त केले.
पुणे बुक फेअर या ग्रंथ प्रदर्शनाचे आणि मराठी साहित्य मेळ्याचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, अतिरिक्त विभागीय आयुक्त स्वाती देशमुख, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे अध्यक्ष डाॅ. संजय चोरडिया, प्रसारभारतीचे इंद्रजित बागल, पुणे बुक फेअरचे संयोजक पी. एन. आर. राजन, शिरीष चिटणीस यावेळी उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, साहित्य ही धर्म, प्रांत, जात, भाषेच्या पलीकडे माणसे जोडणारी शक्ती आहे. आजच्या घडीला भाषाभगिनींमध्ये स्नेह वाढला पाहिजे. जागतिकीकरणानंतर वाचकांच्या जाणीवांचा परीघ सुद्धा विस्तारलेला नाही. त्यामुळे फक्त आपल्या भाषेपुरता विचार न करता आपण अन्य भारतीय भाषा आणि जगभरातील भाषांमधील उत्तम साहित्य वाचले पाहिजे, अशी वाचकांची मानसिकता झाली आहे. ती खूप महत्त्वाची आहे. आजच्या समाजाला डिजिटल जगातून बाहेर पडण्याची गरज आहे. ग्रामीण भागात पुस्तक जत्रा आयोजित करण्याची गरज आहे.