

पुणे: येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट (एच. एन. डी. जैन बोर्डिंग) या संस्थेचा जमीन विक्री व्यवहार धर्मादाय आयुक्तांकडून रद्द करण्यात आला आहे. राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी गुरुवारी हा निकाल दिला. या आदेशामुळे जैन बांधवांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Pune News)
जमीन विक्री व्यवहाराला 4 एप्रिल 2025 रोजी दिलेल्या मंजुरीचा आदेश रद्द करण्यात आला असून विक्री खत व पॉवर ऑफ ॲटर्नी रद्द करावी आणि मालमत्ता पुन्हा ट्रस्टकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार ‘गोखले लँडमार्क्स एलएलपी’ या डेव्हलपर फर्मशी झालेला व्यवहार पूर्णपणे रद्द करण्यात आला असून विक्रीतून मिळालेली रक्कम ट्रस्टने परत करणे बंधनकारक केले आहे. तसेच संबंधित मालमत्ता ट्रस्टच्या नावावर परत नोंदविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी आणि जैन समाजासाठी उभारली गेलेली ही संस्था काही लोकांनी बिल्डरला विकल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्याविरुद्ध अक्षय जैन, आनंद कांकरिया, स्वप्निल गंगवाल, महावीर चौगुले, राजू शैट्टी यांच्यासह संपूर्ण जैन समाज आक्रमक झाला होता. आचार्य गुरुदेव गुप्तीनंदीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात, या लढ्यात ॲड. योगेश पांडे, अण्णा पाटील, चंद्रकांत पाटील, सुकौशल जिंतुरकर आदींनी कायदेशीर बाजू सांभाळली आणि सुनावणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दिलेला शब्द मी पाळला; माझ्यावरील आरोप खोटे : मोहोळ
जैन बोर्डिंगप्रकरणी जो शब्द दिला होता, तो मी पाळला आहे. जैन मुनी गुप्तीनंदीजी महाराज यांच्या विनंतीवरून मी या प्रकरणात उतरलो होतो. त्यांचे सर्व म्हणणेही मी ऐकून घेतले होते. त्यावेळी जैन समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मी दिले होते. अखेर धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द केला आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आदेशातील महत्त्वाचे मुद्दे
ट्रस्टला दिलेली विक्री मंजुरी रद्द.
8 ऑक्टोबर 2025 रोजीचे विक्रीखत आणि पॉवर ऑफ अटर्नी रद्द.
ट्रस्टने विक्रीतून मिळालेली रक्कम (टीडीएस वगळून) परत करणे बंधनकारक.
मालमत्ता पुन्हा ट्रस्टच्या नावावर नोंदविण्याचे निर्देश.
दोन्ही अर्ज (CC/08/2025 व CC /50/2025) निकाली काढण्यात आले