

पुणे: शहरात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या पार्श्वभूमीवर बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पोलिसांनी कारवाई केली. आठवडाभरात पोलिसांनी वेश्यावस्तीत दुसऱ्यांदा कारवाई करून 22 तरुणींना ताब्यात घेतले. त्यापैकी 11 तरुणी बांगलादेशी असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.
पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनात खडक आणि फरासखाना पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत मंगळवारी (दि. 17) रात्रीपासून बुधवारी (दि. 18) पहाटेपर्यंत ही कारवाई केली आहे. बुधवार पेठेत पोलिसांनी यापूर्वी केलेल्या कारवाईत दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले होते. तसेच, अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला अटक केली होती. त्याच्याकडून चरस तसेच इंजेक्शन जप्त केली होती.
त्यानंतर बुधवार पेठेत बांगलादेशी तरुणी बेकायदा वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फरासखाना आणि खडक पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी या भागातील कुंटणखान्याची तपासणी केली. पोलिसांनी संशयावरून 22 तरुणींना ताब्यात घेतले. त्यापैकी 11 तरुणींनी ओळखपत्र तसेच नागरिकत्वाची कागदपत्रे सादर केली. उर्वरित 11 तरुणींची चौकशी केली असता त्यांनी बांगलादेशी असल्याची माहिती दिली.
कागदपत्रे तपासणीत त्या बांगलादेशी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी फरासखाना पोलिस ठाण्याला भेट दिली. बांगलादेशी तरुणी बुधवार पेठेत कशा आल्या. त्यांना दलालाने पुण्यात कसे आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी पोलिसांनी बुधवार पेठेत झाडाझडती घेतली होती. या कारवाईत पोलिसांनी जवळपास 700 जणांची चौकशी केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी बुधवारी (18 फेबुवारी) बुधवार पेठेत कारवाई केली.
ज्या कुंटणखान्यात बांगलादेशी तरुणी सापडल्या, असे कुंटणखाने सीलबंद करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यापुढील काळात बुधवार पेठेत नियमित कारवाई करण्यात येणार आहे.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे