

पुणे: महापालिकेच्या रणधुमाळीत भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होणार होती. मात्र, हा मुहूर्त हुकल्याने ही यादी शनिवारी प्रसिद्ध होईल, अशी आशा इच्छुकांना होती. मात्र, शनिवारी देखील यादी प्रसिद्ध झाली नाही. यामुळे यादीत आपले नाव येईल का? या विवंचनेत भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे आपली नावे यादीत यावी यासाठी शनिवारी झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर अनेक इच्छुकांनी शहराध्यक्ष धीरज घाटे व कोअर कमिटीच्या सदस्यांभोवती गराडा घातला होता. पक्ष नेत्यांशी फोनवर बोलून नावे अंतिम करण्याचा दबाव आणण्याचे प्रयत्न देखील आता सुरू करण्यात आले आहे.
भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. भाजपची पहिली यादी ही शुक्रवारी जाहीर होणार होती. यासाठी पुण्यानंतर मुंबईत देखील प्रदेश कामिटीची बैठक पार पडली. त्यामुळे यादी जाहीर होईल, अशी आशा होती. मात्र, यादी जाहीर झाल्यावर ज्यांची नावे यादीत आले नाही ते बंडखोरी करण्याची शक्यता गृहीत धरून भाजपने उमेदवारी यादी जाहीर करण्याऐवजी थेट उमेदवारी निश्चित झालेल्यांना निरोप देऊन कामाला लागण्याचे आदेश दिले.
प्रदेश कमिटीत 100 नावे निश्चित केली आहे. तर 35 ते 40 जागांवरील उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाला नाही. ज्या नावावर एकमत झाले नाही त्या नावांचा तिढा सोडवण्यासाठी शनिवारी देखील पुण्यातील एका बड्या हॉटेलमध्ये पुन्हा कोअर कामिटीची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे रविवारी रात्री किवा सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाआधी भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत सर्वेक्षणात विजयाची शक्यता जास्त असणाऱ्या ‘ए प्लस’ अशा नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
यादीत नावे आणण्यासाठी इच्छुकांच्या पक्षनेत्यांच्या भेटी वाढल्या भाजपमध्ये तब्बल अडीच हजार इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यांच्या मुलाखती होऊन निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची प्रभागनिहाय सर्वेक्षण देखील झाले आहे. अशा उमेदवारांची यादी कोअर कमिटीने निश्चित करून ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादर केली होती. मात्र, या बैठकीत अनेक प्रभागांमधील उमेदवार निश्चित करण्यावरून कोअर कमिटीमधील पदाधिकाऱ्यांमध्येच वाद झाला होता. ज्या नावावर एकमत झाले नाही त्यावर मुख्यमंत्र्यांनी मी स्वत: निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. यादी जाहीर न झाल्याने व आपली नावे यादीत येण्याची शक्यता नाही अशी कुणकुण लागलेल्या इच्छुकांनी शनिवारी पक्षप्रवेशादरम्यान शहराध्यक्ष धीरज घाटे यांना घेराव घातला. या इच्छुकांनी त्यांची भूमिका मांडत यादीत नाव यावे यासाठी दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे.
महिला आरक्षणामुळे उमेदवारीचा पेच वाढला
महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी महिला आरक्षण पडले आहे. या ठिकाणी अनेक पुरुष उमेदवार इच्छुक होते. खुल्या जागेतून एका घरातील दोघांनी लढण्याचा आग््राह धरला होता. यावर तडजोड करत पक्ष नेत्यांनी दोघांपैकी एकाने आपल्या घरातील महिलेला उमेदवारी द्यावी, आशा सूचना केल्या आहेत. मात्र, दोन्ही जागांवर लढण्याची भूमिका त्यांनी घेतल्याने पक्षनेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान या भूमिकेमुळे काहींचा पत्ता कट होण्याची देखील स्थिती काही प्रभागात निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.