

खुटबाव: कासुर्डी येथील जय हिंद विद्यालयात 22 ते 27 डिसेंबर यादरम्यान पुरातन, ऐतिहासिक व दुर्मीळ वस्तू प्रदर्शनाबरोबरच नव्या व जुन्या पारंपरिक खेळाने क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला. ही माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. के. थोरात यांनी दिली.
या प्रदर्शनात पुरातन काळातील व ऐतिहासिक वस्तू, जुनी नाणी, शेतीची जुनी अवजारे, स्वयंपाकघरातील विविध धातूंची जुनी भांडी, जुन्या दुर्मीळ वस्तू, जुन्या काळातील दुर्मीळ कपडे, पादत्राणे, जनावरांची, व्यक्तींची जुनी दुर्मीळ आभूषणे, जुनी दगडी भांडी तसेच वस्तू यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये 113 दालनांतून 306 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच आजच्या नव्या खेळाबरोबरच सूरपाट्या, भोवरे, विटी-दांडू, काच-कवड्या, सागर-गोटे, आठ चंपाल, कवड्या बोटावरच्या, सुई-दोरा इत्यादी पुरातन अशा जुन्या खेळांची पारंपरिक स्पर्धात्मक खेळ घेण्यात आला.
दरम्यान, या प्रदर्शनात औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आणि त्यांचे उपयोग आणि फायदे याची देखील माहिती देण्यात आली. विद्यालयातील 702 विद्यार्थ्यांपैकी 343 विद्यार्थ्यांनी 149 दालनांतून हे प्रदर्शन मांडले होते. गवती चहापासून काटेरी वनस्पती, दुर्मीळ निवडुंग, आवळे, जंगली वनस्पती, औषधी वनस्पती आदींचा प्रदर्शनात सहभाग होता.
यासह विज्ञान प्रदर्शन देखील यावेळी घेण्यात आले. यामध्ये लहान-मोठे 162 प्रयोगांचे प्रात्यक्षिक मांडण्यात आले. रांगोळी, मेहंदी, व्यंगचित्र, निसर्गचित्र, व्यक्तिचरित्रे, अक्षरलेखन, शुद्ध हस्ताक्षर, निबंध वकृत्व आदी 55 पेक्षा जास्त बौद्धिक शारीरिक मैदानी कलात्मक स्पर्धा घेण्यात आल्या.जय हिंद विद्यालयात पुरातन वस्तू, पारंपरिक खेळ व विज्ञान प्रदर्शनाचा भव्य क्रीडा सप्ताह
प्रदर्शन व स्पर्धांचे उद्घाटन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम भोंडवे, सचिव दत्तात्रय वीर, संचालक तात्याबा ठोंबरे, श्रीदीप टेकवडे, रमेश गायकवाड, सोसायटीचे माजी अध्यक्ष सोपान गायकवाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. के. थोरात, पर्यवेक्षक विलास जगताप यांनी केले. नियोजन दादासाहेब शेवते, आशा म्हेत्रे, दत्तात्रय कांचन, तुकाराम शेंडगे, बापू मेरगळ, काकासाहेब ढवळे, सागर सातपुते, संतोष कारंडे, विजय बनसोडे, राजश्री बारवकर, रोहिणी जगताप, नमता देशमुख, अश्विनी अनपट, कुबेर तरंगे, रमेश गाढवे, शुभांगी थोरात, प्रांजली वीर, सायली वीर या शिक्षकांनी केले.