

शंकर कवडे
पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा-बटाटा विभागात एका संचालकाने प्रशासनाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता गाळ्यामध्ये शीतगृह उभारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कांदा आणि बटाट्याच्या व्यापारासाठी राखीव असलेल्या जागेचा वापर शीतगृहासाठी करण्यात आल्याने बाजार समितीच्या नियमांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बाजार समितीतील व्यापारी आणि अडते यांना विविध नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. संबंधित विभागात केवळ मंजूर व्यापारच करण्याची अट असताना, एका संचालकाने मात्र गाळ्याचा वापर शीतगृहासाठी केल्याने बाजारातील घटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या शीतगृहासाठी बाजार समिती प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे प्रशासनातील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी एक नियम आणि संचालकांसाठी दुसरा नियम असा प्रकार सुरू आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, संबंधित विभागात कांदा-बटाट्याचा नियमित व्यापार होणे अपेक्षित असताना गाळ्यात शीतगृह उभारण्यास परवानगी कोणी दिली? प्रशासनाने त्यावर कारवाई का केली नाही? संचालक असल्यामुळे नियमांचे उल्लंघन करण्याचे विशेष अधिकार मिळतात का?
असे प्रश्न बाजारातील व्यापारी, अडते आणि इतर बाजार घटकांकडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य शीतगृहावर कारवाई करावी आणि बाजार समितीच्या उत्पन्नाचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी बाजार घटकांकडून करण्यात येत आहे. याबाबत, बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
बाजार समितीचे आर्थिक नुकसान
कांदा आणि बटाट्याच्या व्यवहारावर बाजार समितीला सेसच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. संबंधित मालाची खरेदी-विक्री झाल्यानंतर एकूण उलाढालीवर एक टक्का सेस बाजार समितीकडे जमा होतो. मात्र, गाळ्यात शीतगृह उभारून माल साठवला जात असल्याने त्या व्यवहारातून बाजार समितीला कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, बाजार समितीच्या महसुलाला फटका बसत असून नियमबाह्य शीतगृहामुळे समितीच्या उत्पन्नावर गदा येत असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी स्पष्ट केले.