

बारामती: अनेक दूध व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या येथील विद्यानंद ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आनंद लोखंडे व विद्या लोखंडे (रा. जळोची, बारामती) यांच्या घरावर बुधवारी (दि. १०) ईडीने छापेमारी केली. याबाबतचा अधिक तपशील मात्र अधिकाऱ्यांनी दिला नाही.
विद्यानंद ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजच्या माध्यमातून डेअरी, ऍग्रो असे अनेक उद्योग सुरु होते. या प्रकरणात आनंद लोखंडे व विद्या लोखंडे यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत त्यांच्या विरोधात कोट्यवधींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. विद्यानंद डेअरी प्रा. लि. च्या माध्यमातून तब्बल १० कोटी २० लाखाची फसवणूक झाल्याचा गुन्हा अंबोली पोलिस ठाण्यात दाखल होता.
कोट्यवधींच्या परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडून परतावा दिला नसल्याच्या तक्रारी बारामतीसह विविध पोलिस ठाण्यात दाखल होत्या. यात अगदी मंत्रालयातील काही मोठ्या अधिकाऱ्यांची देखील फसवणूक झाली होती.
तरुण उद्योजक म्हणून अल्पावधीत नावारुपाला आलेल्या लोखंडे याच्यावर एका राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याचे बोलले जाते. त्याच्या विरोधात सुरुवातीला गुन्हे दाखल करण्यासही टाळाटाळ केली जात होती. अखेर गुन्हे दाखल झाले.
गुन्ह्यांची आणि फसणवूक प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणी आता ईडीने छापेमारी केली आहे. यासंबंधीचा अधिक तपशील मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांकडून दिला गेला नाही.