

पुणे: फोटोग््रााफी व्यवसायाकरिता कॅमेरा खरेदीसाठी मिळणाऱ्या 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी 15 हजार रुपये लाच घेणारा महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक आणि सहायक लेखा अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) अटक केली आहे.
मागासवर्गीयांना व्यवसायासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. हे अनुदान मिळावे, म्हणून एकाने अर्ज केला होता. ती फाईल मंजूर करून विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यासाठी ही लाच घेण्यात आली आहे. जिल्हा व्यवस्थापक महेंद्र मलेशा माने (वय 56, रा. पी जी बॉईज हॉस्टेल, पुणे-आळंदी रोड, विश्रांतवाडी, मूळ रा. सोलापूर), सहायक लेखा अधिकारी संतोष नामदेव शिंदे (वय 55, रा. सनगौरी अपार्टमेंट, कुंबरे टाऊनशिप, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार हे फोटोग््रााफर असून, त्यांना व्यवसायासाठी 3 लाख रुपयांचा कॅमेरा खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांनी एका बँकेत कर्जासाठी अर्ज केला होता. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडून मागासवर्गीय लोकांना व्यवसायासाठी 50 हजार रुपये अनुदान देण्यात येते. त्यासाठी तक्रारदाराने सप्टेंबर 2025 मध्ये अर्ज केला होता. महेंद्र माने हे जिल्हा व्यवस्थापक आहेत. सतोष शिंदे हे सहायक लेखा अधिकारी असून, महामंडळाकडे लाभार्थींनी दाखल केलेल्या प्रकरणांत साईट व्हिजिट करून लाभार्थींकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन जिल्हा व्यवस्थापक महेंद्र माने यांच्या शिफारशीनंतर ते प्रकरण अनुदान मंजुरीसाठी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात पाठविण्याचे काम करतात.
दरम्यान, या दोघांनी तक्रारदाराने दाखल केलेल्या अनुदानाचे प्रकरण सकारात्मक शिफारशीसह महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या विभागीय कार्यालयात पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराने 30 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली. त्याची 4 व 5 फेबुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती 15 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
लाचखोरांना 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
लाचखोरांना पकडण्यासाठी 5 मार्चला सायंकाळी रास्ता पेठेतील आपोलो चौकातील कॅफेसमोर सापळा रचण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता तक्रारदाराकडून 15 हजारांची लाच स्वीकारताना संतोष शिंदेला पकडण्यात आले. त्यानंतर महेंद्र मानेला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. दोघांना शुक्रवारी विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे करीत आहेत.