पुणे : जमिनीच्या खरेदीखतास नकार देत १० लाखांची फसवणूक

पुणे : जमिनीच्या खरेदीखतास नकार देत १० लाखांची फसवणूक

बारामती : पुढारी वृत्तसेवा : जमीन खरेदीचा व्यवहार ठरल्याप्रमाणे दहा लाखांची रक्कम स्वीकारल्यानंतरही खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करत फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सुनीता शांताराम पिंगळे (मूळ रा. शिरष्णे, ता. बारामती, सध्या रा. वाघोलीकर पार्क, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अशोक विठ्ठल महानवर, रुपाली अशोक महानवर, रेखा आबाजी येळे (तिघे रा. खंडोबाचीवाडी, ता. बारामती) आणि सुजित किसन गायकवाड (रा. सणसर, ता. इंदापूर) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. ४ डिसेंबर २०१९ ते १४ जुलै २०२० या कालावधीत ही घटना घडली.

फिर्यादी सुनिता पिंगळे यांच्या कुटुंबियांची २०१९ मध्ये सुजित गायकवाड यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनी खडकी (ता. फलटण, जि. सातारा) येथील जमीन गट क्रमांक ४४४ मधील विठ्ठल मारुती महानवर यांच्या मालकीचे ७४ आर क्षेत्र विक्री करायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार अशोक महानवर व सुजित गायकवाड हे बारामतीत आले. फिर्यादीसोबत त्यांचा १० लाख रुपयांना जमीन विक्रीचा व्यवहार ठरला. त्यानंतर फिर्यादीने विठ्ठल महानवर यांच्या नावे ७ लाखांची रक्कम आरटीजीएस केली. या क्षेत्राची विसार पावती करण्यात आली. त्यानंतर फिर्यादीने खरेदीखतासाठी आग्रह धरला. परंतु त्यासाठी महानवर यांच्याकडून टाळाटाळ केली जावू लागली.

दरम्यान, २४ डिसेंबर २०१९ रोजी विठ्ठल महानवर हे मयत झाले. त्यानंतर अशोक यांनी खरेदीखत करून देतो, अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे फिर्यादीने पुन्हा उरलेली रक्कम अशोक व अन्य हिस्सेदारांना देत साठेखत करून घेतले. यामध्ये सहा महिन्यांत खरेदी खत करून देवू, असा उल्लेख करण्यात आला; परंतु त्यांनी पुढे खरेदीखत करण्यास टाळाटाळ करत फिर्यादीची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्‍याचे फिर्यादीत म्‍हटलं आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news