पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील क्रीडाविश्वात प्रसिद्ध असलेल्या पुढारी राईज अप – सीझन ४ अंतर्गत महिलांच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचा आज, शनिवार दिनांक ९ वाजता लोकमान्य टिळक जलतरण तलाव येथे शुभारंभ होत आहे. ही स्पर्धा पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
या हंगामात नुकतीच कुस्ती स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली असून आजपासून जलतरण स्पर्धेला सुरुवात होत आहे. यासोबतच बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, कबड्डी आणि बुद्धिबळ या खेळांच्या स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहेत.
RISE UP – Season 4 (2026) अंतर्गत होणारी ही जलतरण स्पर्धा ७ वर्षांखालील, ९ वर्षांखालील, ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील, १६ ते २० वर्षे, २१ ते ३० वर्षे, ३१ ते ४० वर्षे आणि ४० वर्षांवरील अशा एकूण ९ वयोगटांमध्ये होणार आहे.
प्रत्येक वयोगटातील प्रथम तीन विजेत्यांना पदक, मेरिट प्रमाणपत्र तसेच प्रत्येक गटातील उत्कृष्ट जलतरणपटूला चॅम्पियनशिप ट्रॉफी देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरिच (Oxyrich) असून, फायनान्स पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि अॅकॅडमिक पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच अदानी हे सहप्रायोजक, तर व्हॅलेन्टिन इंडस्ट्रीज हे असोसिएट पार्टनर आहेत.
या स्पर्धेसाठी पुणे शहरासह पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड परिसरातून मोठ्या प्रमाणावर महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.