

NCP alliance news
बारामती, पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गटाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही पक्षांना अपेक्षित यश मिळाले नाही. आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढविण्याचा निर्णय बारामती येथे आज (दि. १७) पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. मात्र याबाबत दोन्ही पक्षांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
राज्यातील महापालिका निवडणुकांत दोन्ही राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही रात्री उशिरा बारामतीत दाखल झाले. यानंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीतील त्यांच्या गोविंद बाग निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार आदींची उपस्थिती होती.
शुक्रवारी राज्यभरातील २९ महापालिकांचे निवडणूक निकाल लागले. त्यात दोन्ही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालेले नाही. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पवार एकत्र लढले. परंतु तरीही कामगिरी समाधानकारक झालेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार आज बारामतीमध्ये झालेल्या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे कृषी 2026 प्रदर्शनाच्या उद्घाटन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर बारामतीत शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य नेते मंडळींची महत्त्वाची पत्रकार परिषद ही पडणार आहे.