पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील एका प्राध्यापकाला सायबर चोरट्यांनी 20 लाख 59 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. पार्टटाईम जॉबचे प्रलोभन अन् कमिनशचा मोह दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी, कोंढवा बुद्रुक येथील 42 वर्षीय प्राध्यापकाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रेखा रंजन, राशीन, आदित्य, बजाज (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादींना सायबर चोरट्यांनी मेसेजद्वारे संपर्क करून पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवले. फिर्यादीने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून संपर्क केला. त्या वेळी आरोपींनी त्यांना एफके मॉलमधून बोलत असल्याचे सांगून एका नामांकित ऑनलाईन कंपनीसाठी प्रोडक्ट एक्सपोजर हवे असल्याचे सांगितले. त्यांनी त्या कंपनीच्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर प्लेस केल्यास मोठे कमिशन मिळेल, अशी बतावणी केली. त्यासाठी प्राध्यापकांचे एक वॉलेटदेखील त्यांनी उघडून घेतले. सुरुवातीला प्राध्यापकांनी काही ऑर्डर प्लेस केल्या.
त्यानंतर दुसर्या दिवशी दुप्पट पैसे आरोपींनी खात्यात जमा केले. दरम्यान प्राध्यापक अलगद सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकले. पुढे त्यांनी जास्त पैसे मिळतील या मोहाला बळी पडून मोठ्या-मोठ्या ऑर्डर केल्या. कमिशनचे पैसे त्यांच्या वॉलेटमध्ये जमादेखील झाल्याचे दिसून येत होते. मात्र त्यांना ते काढता येत नव्हते. असे करून त्यांनी वेळोवेळी तब्बल 20 लाख 59 हजार 823 रुपये सायबर चोरट्यांच्या हवाली केले. मात्र गुंतवणूक केलेले पैसे आणि कमिशनही मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिळीमकर करीत आहेत.
हेही वाचा