काँग्रेस पदाधिकार्‍यांमध्ये खडाजंगी; निवडणुकीच्या तयारीची बैठक ठरली वादळी

Congress
Congress

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिका निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठीच्या शहर काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकार्‍यांमध्ये खडाजंगीचा प्रकार घडला.
माजी मंत्र्याने भाजपच्या माजी नगरसेवकांशी केलेल्या चर्चेवर एका माजी नगरसेवकाने थेट आक्षेप घेतल्याने या दोघांमध्ये वादावादी घडली, तर महापालिकेतील माजी पदाधिकारी आणि शहराध्यक्ष यांच्यात खटके उडाल्याने ही बैठक वादळी ठरली.

काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक गुरुवारी काँग्रेस भवनात बोलाविण्यात आली होती. या बैठकीत ईदगाह मैदानावर काँग्रेसच्या माजी मंत्र्याने भाजपच्या माजी नगरसेवकांशी चर्चा केली. त्यांच्या कामाचे कौतुक केले, तसेच त्यांना चांगले काम करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असेही सांगितले. अशा पध्दतीने विरोधकांना पाठबळ देणे चुकीचे असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर संबंधित माजी मंत्रीही भडकले. ही बोलण्याची पध्दत नाही. विरोधी पक्षातील मंडळींशी भेटल्यानंतर आपण बोलतो, त्यावर अशा पध्दतीने आक्षेप घेणे चुकीचे आहे. यापूर्वी काहींनी थेट पक्षाविरोधात कंदील घेऊन निवडणुका लढविल्या होत्या, असेही त्यांनी सुनावले.

बैठक बोलावण्यावरूनही 'तू तू मै मै'

संबंधित माजी नगरसेवक आणि माजी मंत्री यांच्यातील ही 'तू तू मैं मैं' कशीबशी संपली असतानाच महापालिकेतील एका माजी पदाधिकार्‍याने, 'बैठक बोलाविण्याआधी किमान आम्हाला दोन दिवस आधी कळवत जा, कधीही अशा बैठका बोलाविल्या जातात, त्यात काय चर्चा होते आणि त्यातून काय नक्की फायदा होतो, हेही समजत नाही,' अशा शब्दांत हल्ला चढविला; त्यावर शहराध्यक्षांनी, 'मी माझ्या घराच्या कामासाठी बैठका बोलवत नाही. यापूर्वी अशा पध्दतीनेच बैठका होत होत्या. तेव्हा तुम्ही आक्षेप घेतला नाही,' असे सुनावले.

ही चर्चा संपत असतानाच प्रदेशपातळीवरील एका माजी नेत्याने विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगरची जागा अगदी कमी मताने आपण हरलो. या निवडणुकीत ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावर एका माजी नगरसेवकानेही कसबा मतदारसंघात काही मंडळींनी पक्षाविरोधात काम केले आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,' अशी मागणी केली. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी बोलाविलेली ही बैठक चांगलीच वादळी ठरली. याबाबत प्रदेश कार्यकारिणीतील एका पदाधिकार्‍याने या बैठकीचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठविणार असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news